मुंबई : पक्ष्यांचे पंख घेऊन त्यावर सिंहासनस्थ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि जाणता राजा ही अक्षरे, तलवार कोरून विक्रोळीतील निलेश चौहान या तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली आहे. टर्की, मोर या पक्ष्यांच्या पंखांपासून आगळीवेगळी कलाकृती तयार होऊ शकते, हे निलेश याने दाखवून दिले आहे.
निलेश याने पंखाच्या वरच्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती कोरली आहे. तसेच जाणता राजा ही अक्षरे आणि तलवारही पंखावर कोरली आहे. राज्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी होत आहे, त्यानिमित्ताने निलेशने छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली आहे.
लहानपणापासून चित्रकलेची आवड असणाऱ्या निलेशला
आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. पंखावरती चित्रे, अक्षरे कोरण्याच्या कलेने त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. इयत्ता दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर निलेशने ग्राफिक्स डिझाईनचा कोर्स पूर्ण केला. ऍड एजन्सीमध्ये कामही केले. परदेशात अशा प्रकराची कला त्याच्या बहिणीने पाहिली. तिने निलेशला त्याबाबत माहिती दिली. यानंतर निलेशने अवजारांच्या साहाय्याने पंखांवर चित्रे कोरणे सुरू केले. पहिल्या प्रयत्नातच तो यशस्वी झाला. वाघाचे चित्र त्याने पहिल्यांदा कोरले. आता तीन वर्षांपासून तो ही कलाकृती सादर करत आहे.
आतापर्यंत 40 पेक्षा जास्त कलाकृती तयार केल्या आहेत. हे पंख व्यवस्थित राहावेत, यासाठी विशिष्ट फोटो फ्रेमचा वापर करण्यात येतो. तसेच पंखावर प्रक्रियाही करण्यात येते.
“भारतात ही कला प्रसिद्ध नाही आहे. ही कला विकसित करणारा या देशात कदाचीत मी पहिला असू शकेन. कोरीव काम करणे ही लहानपणापासूनची आवड होती. झाडाची पाने, कागदपत्रे यावर कोरीव काम करून कलाकृती तयार केल्या आहेत. टर्की, मोर यांच्या पिसांपासून वाघ, मोर तसेच उरी चित्रपटाचीही कलाकृती मी तयार केली आहे. एका पंखावर काम करण्यासाठी किमान 2 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो. आधी ही कलाकृती मी स्वतःसाठी तयार करत होतो. एक वर्षांपासून विकणं सुरू केले असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. फ्रेममध्ये बंदिस्त असल्याने ही कला टिकाऊ आहे.” असे निलेश म्हणाला.