मुंबई । तथागत गौतम बुद्ध राजकुमार असताना त्यांची आणि देवदत्तची एक कथा प्रसिद्ध आहे. ज्यात देवदत्त एका पक्ष्याला बाण मारतो आणि राजकुमार सिद्धार्थ त्या पक्ष्याचे प्राण वाचवतात. त्यावेळी देवदत्त म्हणतो की, “या पक्ष्याचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो, तोच त्या शिकारीचा मालक होतो.”
यावर राजकुमार सिद्धार्थ असे म्हणतात,” जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यायचा असतो, तो त्याचा मालक कसा होऊ शकतो?”
शेवटी हा प्रश्न लवादाकडे जातो. सिद्धार्थचा दृष्टीकोन योग्य आहे, असा निर्णय लवाद देते.
याच कथेची आठवण करत विक्रोळी येथील कलाकार निलेश चौहान यांनी पक्ष्याच्या पिसावर बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत गौतम बुद्ध यांची मनमोहक प्रतिमा कोरली आहे. तथागतांनी दिलेला करुणेचा संदेश देण्याचा माझा हा प्रयत्न असल्याचे निलेश सांगतात. ज्या पिसांवर मी ही प्रतिमा कोरली आहे ते पीस ज्यांच्याकडे पाळीव पक्षी आहे त्यांच्याकडून घेतले आहेत, असे निलेश यांनी सांगितले.
दक्षिण अमेरिका स्कार्लेट मकाऊ ही पोपटाची प्रजाती आहे. या जातीतील पोपटाचे पीस यासाठी वापरले. कलाकृती साकारण्यासाठी दोन दिवस लागले, अशी माहिती निलेश यांनी दिली. पक्ष्यांच्या पिसांवर विविध प्रतिमा कोरण्याची कला आत्मसात करणारे निलेश हे देशातील मोजक्या कलाकारांपैकी एक आहेत.