मुंबई, विशेष प्रतिनिधी: – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन येत्या रविवारी ६ डिसेंबर रोजी आहे. दरवर्षी ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी हे डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र, ‘कोविड – १९’ या संसर्गजन्य आजाराच्या साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता, खबरदारीची उपाययोजना म्हणून ५ ते ७ डिसेंबर दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्यात येणार आहे. बंदच्या काळात येथे नये आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका उप आयुक्त विश्वास शंकरवार व ‘ग्लोबल पॅगोडा’चे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे केले आहे.
महानगरपालिकेच्या बोरिवली येथील पालिकेच्या विभाग कार्यालयात विविध संघटनांसमवेत एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. उप आयुक्त विश्वास शंकरवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला ‘आर मध्य’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, ‘ग्लोबल पॅगोडा’ चे व्यवस्थापक एस. एस. शिंदे, संबंधित सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी), एस. डी. वडके, वरिष्ठ पोलिस निरिक्षक एस. एम. नारकर, अधिकारी आणि ‘ग्लोबल पॅगोडा’ चे संबंधित कर्मचारी उपस्थित होते.