रत्नागिरी (आरकेजी): पालघर लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजप-शिवसेनेमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत दिसणार आहे. भाजपचा परंपरागत मतदार संघ राहिलेल्या या मतदार संघात पहिल्यांदा शिवसेनेनी आपला उमेदवार देवू केलाय. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा सेना आणि भाजप आमने सामने येणार आहे. दरम्यान आमदार निरंजन डावखरे यांनी चांगलं काम केलं आहे, त्यामुळे यावेळी कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरे याचाच विजय होईल, असा विश्वास भाजप नेते आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
कोकण पदवीधर मतदार संघ हा भाजपचा एकेकाळचा बालेकिल्ला. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं हा भाजपचा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेतला. मात्र या आगोदरच्या प्रत्येक निवडणुकीत इथं भाजपची जागा निश्चित मानली जायची. कारण शिवसेनेची सुद्धा भाजपला साथ असायची. मात्र आता या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेनंही उडी घेतली आहे. शिवसेनेनं पहिल्यांदा आपला उमेदवार या निवडणुकीसाठी उभा केला आहे. ठाण्याचे माजी महापौर संजय मोरेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपात गेलेल्या निरंजन डावखरेंसमोर शिवसेनेनं आव्हान उभी केल्याची चर्चा आहे. या निवडणुकीसाठी सर्वात जास्त मतदार ठाणे जिल्ह्यातील आहेत. ३५ हजाराच्या वर मतदार ठाण्यात आहेत. तर पालघरमध्ये जवळपास १५ हजार, तर रायगडमध्ये १९ हजाराच्या आसपास मतदार आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ हजारच्या घरात मतदार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघात आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये ठाणे, रायगड जिल्ह्यांनाच उमेदवारीसाठी प्राधान्य मिळाले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे विजयी झाले होते. त्यांची मुदत येत्या ७ जुलै २०१८ रोजी संपत आहे. मात्र, यावेळी निरंजन डावखरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमाध्ये प्रवेश केला. कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपच्या वतीने निरंजन डावखरे यांची शिफारस करण्यात आलीय. त्याचवेळी आता शिवसेनेनी उमेदवार दिल्यानं या निवडणुकीत भाजप आणि सेना असा संघर्ष पहायला मिळणार आहे. त्यातच
शिक्षक मतदारसंघातील माजी आमदार रामनाथ मोते यांच्या भाजपा प्रवेशामुळे अॅड. निरंजन डावखरे यांची बाजू मजबूत झाली आहे. माजी आमदार मोते यांना मानणारा मोठा शिक्षक वर्ग आहे. त्यांनी शिक्षक मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. राष्ट्रवादीचे कोकण पदवीधरचे आमदार डावखरे भाजपामध्ये दाखल झाल्याने राष्ट्रवादीकडून डावखरेंना तोडीस तोड ठरेल, अशा उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. दरम्यान शिवसेनेच्या उमेदवाराचं आमच्या समोर मोठं आव्हानं नसेल असं राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील राजकीय सामान्यामुळे हि निवडणुक आता आणखी रंगतदार होणार आहे.