
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे गणपतीचं जागृत देवस्थान. अनेक गणेश भक्तांची या गणपतीवर श्रद्दा आहे. आजच्या काळात गावातली एकी टिकावी किंवा गावात भांडणे कमी व्हावीत म्हणुन तंटामुक्तीमधून एक गाव एक गणपती अशी संस्कृती राबवण्याचा प्रयत्न केला जातो एकोप्यासाठी हि पंरपरा गणपतीपुळ्याच्या देवळात गेली ५०० वर्ष जुनी आहे. गणपतीपुळे, मालगुंड, वरवडे, नेवरे, वरवडे या पाच गावात कुठल्याच मूळ स्थानिकाच्या घरी गणपती आणला जात नाही. या गावात हजारो कुटुंब आहेत. गेली कित्येक पिढ्या हि परंपरा या पाच गावात सुरु आहे. या गणेशोत्सवात गणपतीपुळ्याच्या देवळातला गणपती हा आपल्या घरात आणलाय असं समजून सर्व ग्रामस्थ गणपतीपुळ्याच्या देवळात जमतात.प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळ्याच्या पंचक्रोशीत गेली अनेक वर्ष घरात गणपतीच आणला जात नाही. गणपतीपुळ्याच्या मंदिरातील गणेश हाच गणपती मानून त्याची पुजा केली जाते.इतर घरांमध्ये गणपती उत्सवात घरात नैवद्ध करुन दाखवला जातो. या गावात घरात नैवेद्य होतो मात्र तो नैवेद्य़ देवळात वाटला जातो. गणपतीपुळ्यात स्थायिक असलेले अनेक लोक हि प्रथा पाळतात. गणपतीपुळे मंदिरात इथले पाच गावातले ग्रामस्थ जातात. गणपतीच्या पुढ्यातील फुल ते उचलतात. त्यालाच गणपती मानून ते फुल पाच दिवस देव्हाऱ्यात ठेवलं जातं. आणि त्याची पुजा पाच दिवस केली जाते. गौरी विसर्जनासोबत हे फुल विसर्जन केलं जातं. गावातले लोक गणपती उत्सवाच्या दिवसांत मंदिरात जावून तीथं एकत्र येत कार्यक्रम साजरे करतात. सध्याच्या गणेशोत्सवाचं रुप बदलत आहे. प्रदुषण,डिजे वादावादी आणि गावातील गट-तट राजकारण यांनी गणपती उत्सवाला वेगळा रंग चढत आहे. हे रोखण्यासाठी सध्या तंटामुक्ती समितीच्या मध्यमामधून एक गाव एक गणपती हि संकल्पना अनेक ठिकाणी राबवली जाते. मात्र गणपतीपुळ्यातील पुर्वजांनी समाज बांधण्यासाठी एकोपा टिकवण्याचे तंत्र या प्रथेतून तेव्हाच पुढचा विचार करुन दिला.