मुंबई : मुंबई महापालिकेसाठी युती व्हावी यासाठी आम्ही पारदर्शकपणा ही अट शिवसेनेसमोर ठेवली होती. पालिकेचा कारभार पारदर्शक झाला पाहिजे. या तत्वावर आम्हाला २० जागा कमी मिळाल्या तरी चालतील, असे शिवसेनेला सांगितले होते. तरिही त्यांनी आमची अट मान्य केली नाही, उलट युती तोडली. याचाच अर्थ त्यांना पारदर्शकपणा नको होता, असा आरोप राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिवसेनेवर केला. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाची ताकद वाढली आहे, असे शिवसेनेला त्यांनी सुनावले. प्रभाग क्रमांक ११८ चे भाजप उमेदवार मंगेश सांगळे आणि ११९ च्या संगीता भास्कर यांच्या प्रचारसभेसाठी ते कन्नमवार नगर येथे मंगळवारी(ता.१४) रात्री आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र होर्डींग्जवर लावून मते मागितली जात आहेत. यांचे छायाचित्र लावल्यास कळेल मुंबईत काय करून दाखविले ते? अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी केली. गेल्या काही वर्षांत शिवसेना नेते, शाखाप्रमुख, नगरसेवक यांची संपत्ती अनेक पटींनी वाढली. कारभारात पारदर्शकता नसल्यानेच ही संपत्ती वाढली, याकडे तावडे यांनी लक्षं वेधले. आम्ही आमच्या नगरसेवकांची संपत्ती दरवर्षी जाहीर करू, असे सांगायलाही तावडे विसरले नाहीत. विक्रोळीकरांना भेडसावणारे कांजूरमार्ग डंम्पिंग ग्राऊंड, महात्मा फुले रुग्णालय, संक्रमण शिबिरांचे प्रश्न सोडवू, डम्पिंग ग्राउंडवर ऊर्जा प्रकल्प निर्माण करू, असे ते म्हणाले. मंगेश सांगळे यांनी विक्रोळी विभागात केलेली विकासकामे या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले. मुंबईच्या विकासासाठी भाजपा उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. अनेक जण विचारू लागले आहेत की, माजी आमदार राहिलेले सांगळे यांना नगरसेवकपदाची उमेदवारी देऊन प्रमोशन केले की डिमोशन? याचे उत्तर भाजपाची सत्ता पालिकेत आल्यावरच कळेल. महापालिकेत सांगळेंना महत्वाचे पद दिले जाईल, असे आश्वासन तावडेंनी यावेळी दिले. सांगळे हे याआधी मनसेचे माजी नगरसेवक आणि आमदार राहिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.