
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 2025 निमित्तज्येष्ठांसाठी सर्वांगीण, संवेदनशील आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा प्रदान करणारा दवाखाना
मुंबई, 21 ऑगस्ट 2025 : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 2025 च्या निमित्ताने पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरतर्फे आज ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वांगीण आरोग्यसेवेला समर्पित अशा अनोख्या स्वरूपाच्या विशेष ज्येष्ठ नागरिक दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. या दवाखान्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मि. गौतम खन्ना, ट्रस्टी श्रीमती उषा एस. राहेजा, मुख्य कार्यकारी अधिकारी (ऑपरेशन्स) मि. जॉय चक्रवर्ती आणि व्यावसायिक सेवा संचालक डॉ. संजय अगरवाला यांच्या हस्ते झाले. डॉ. आरती कन्नन यांच्या नेतृत्वाखाली हा दवाखाना चालविला जाणार आहे. त्या स्टॅनफर्ड विद्यापीठ, अमेरिका येथील ज्येष्ठ नागरिक वैद्यकशास्त्रातील क्लिनिकल फेलो म्हणून प्रशिक्षित आहेत. या दवाखान्यात मुख्यत्वेकरून निरोगी वृद्धत्व, दीर्घकालीन आजारांचे व्यवस्थापन आणि ज्येष्ठांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या विभागानुसार भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 2050 पर्यंत दुप्पट होणार असून, देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 20 टक्क्यांहून अधिक लोक 60 वर्षांवरील वयोगटात असतील. या लोकसंख्याविषयक बदलामुळे अनेक दीर्घकालीन आजारांचे व्यवस्थापन, पडण्यापासून बचाव, हालचालीतील अडचणी, संज्ञानात्मक क्षीणता तसेच विविध तज्ञांच्या साहाय्याने सर्वांगीण आरोग्यसेवेची आवश्यकता अशा विशिष्ट आरोग्यसंबंधी आव्हानांना सामोरे जावे लागेल. या आव्हानांवर मात करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आखलेली समन्वयित व सर्वसमावेशक अशी पद्धत आवश्यक आहे.
या गरजांची पूर्तता करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक दवाखान्यात प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक मार्गदर्शन दिले जाणार असून, अन्यथा निरोगी असलेल्या ज्येष्ठांनाही सहविकारांचे व्यवस्थापन करताना निरोगी वृद्धत्व कसे साध्य करता येईल याविषयी मार्गदर्शन केले जाईल. रुग्णालयाने विशेषतः तयार केलेले ज्येष्ठ नागरिक आरोग्य पॅकेजेस देखील सादर केले असून, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक तज्ञांचा सल्ला घेण्याची सुविधा तसेच निवडक भागांमध्ये घरभेटीच्या सेवेचाही समावेश आहे.
या उद्घाटनप्रसंगी पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मि. गौतम खन्ना म्हणाले, “भारतामध्ये जसजसे वृद्धत्व वाढत आहे तसतसा आरोग्यव्यवस्थेलाही ज्येष्ठांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी बदल करावा लागेल. आमचा ज्येष्ठ नागरिक दवाखाना हा करुणा, तज्ज्ञता आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा यांचा संगम असलेला समर्पित दवाखाना म्हणून उभारण्यात आला आहे. निरोगी वृद्धत्वाच्या प्रवासात ज्येष्ठांना साथ देण्याचे, अनेक सहविकारांचे व्यवस्थापन करण्यास त्यांना मदत करण्याचे आणि कुटुंबियांना सर्वांगीण व समग्र आरोग्यसेवेची खात्री देण्याचे आमचे वचन या दवाखान्याद्वारे प्रतिबिंबित होते.”
हा दवाखाना ज्येष्ठांच्या विशिष्ट गरजांना अनुरूप अशा सर्वांगीण आरोग्यसेवा उपलब्ध करून देणार आहे. यात संपूर्ण आरोग्यमूल्यांकन व वैद्यकीय व्यवस्थापन, स्मरणशक्ती व संज्ञानात्मक तपासणी, बहुऔषधोपचार / अनेक औषधांचे व्यवस्थापन, पडण्यापासून संरक्षण, हाडे व स्नायूंचे आरोग्य, चालणे व संतुलनातील अडचणी, मूत्र व शौच नियंत्रणातील अडचणींचे व्यवस्थापन, आहारविषयक मार्गदर्शन आणि भावनिक स्वास्थ्यासाठी सहाय्य अशा सेवांचा समावेश असेल. तसेच दवाखाना ज्येष्ठांना प्रगत आरोग्य नियोजनाविषयी मार्गदर्शन करेल आणि कुटुंबीय व काळजीवाहूंना आपल्या प्रियजनांची देखभाल करण्यासाठी आवश्यक शिक्षण, माहिती आणि साधनसामग्री पुरवेल.
डॉ. आरती कन्नन, सल्लागार – ज्येष्ठ नागरिक आरोग्यसेवा, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर यांनी सांगितले, “पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आम्ही असा विश्वास ठेवतो की वृद्धत्व हा सन्मान, करुणा आणि तज्ज्ञतेच्या आधाराने समर्थित असा प्रवास असावा. ज्येष्ठांना अनेकदा एकमेकांशी संबंधित अनेक आरोग्यसमस्या भेडसावतात. आमचा ज्येष्ठ नागरिक दवाखाना हा त्यांच्यासाठी योग्य भागीदार ठरेल, कारण येथे प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या व दीर्घकालीन आजारांचे व्यवस्थापन यापासून ते रुग्णालयीन उपचार व डिस्चार्जनंतरच्या पुनर्वसनापर्यंत सर्व प्रकारच्या तज्ज्ञ सल्लागार सेवांचा समावेश एकाच छताखाली उपलब्ध आहे. या दवाखान्याद्वारे आमचे उद्दिष्ट प्रत्येक ज्येष्ठापर्यंत वेळेवर आणि वैयक्तिक लक्ष पोहोचविण्याचे आहे. आमच्या मते निरोगी वृद्धत्व म्हणजे केवळ आजारांचे उपचार नव्हे तर सर्वांगीण स्वास्थ्य आहे— ज्येष्ठांना स्वावलंबन, ताकद, उत्साह आणि अर्थपूर्ण जीवनमान टिकविण्यात मदत करणे हा त्याचा मुख्य गाभा आहे. आमचा ज्येष्ठ नागरिक दवाखाना ज्येष्ठ आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या वृद्धत्वाच्या प्रवासात साथ, समजूत आणि काळजी मिळाल्याची खात्री देतो.”
या विशेष ज्येष्ठ नागरिक दवाखान्याच्या उद्घाटनासह पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर समाजाच्या बदलत्या गरजांनुसार आरोग्यसेवा पुरविण्याच्या आपल्या दृष्टिकोनाला अधिक बळकट करत आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, विशेष उपचार आणि संवेदनशील पाठबळाच्या माध्यमातून वृद्धत्वातील गुंतागुंतीची आव्हाने हाताळत रुग्णालय ज्येष्ठांना सन्मानाने, स्वावलंबीपणे आणि उत्तम जीवनमानासह जगता यावे यासाठी आपल्या बांधिलकीची पुन्हा जाणीव करून देत आहे.















