आर्थिक वर्ष 21च्या एकात्मिक अहवालाची मुख्य वैशिष्ट्ये
- सन 2008पासून 128 दशलक्ष युनिट्सच्या बरोबरीची संचित ऊर्जेची बचत.
- आर्थिक वर्ष 21मध्ये 33,500 टन कार्बन डाय ऑक्साईडइतके उत्सर्जन टाळण्यात यश.
- विविध कॅम्पसमध्ये दीड लाख पूर्ण वाढलेली झाडे; आर्थिक वर्ष 21मध्ये जवळपास 10 लाख रोपांची लागवड.
- आर्थिक वर्ष 21मध्ये सामुदायिक विकास कार्यक्रमांद्वारे 12 लाख नागरिकांच्या जीवनावर साधला परिणाम.
- शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि पाणी व स्वच्छता यांसाठी 150 कोटी रुपये खर्च.
- कंपनीची ‘ग्रीन ऑफरिंग्ज’ 277 अब्ज रुपयांची, उत्पन्नाच्या 29.6 टक्के इतकी.
- संपूर्ण व्यवसायात 1037 दशलक्ष अपघातमुक्त मानव-तास साध्य.
मुंबई, 21 ऑक्टोबर 2021 : भारतातील आघाडीची ईपीसी, हाय-टेक मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस कंपनी अशी ओळख असलेल्या ‘लार्सन अँड टुब्रो’ने आज आपल्या ईएसजीविषयक ध्येयांना व्यावसायिक उद्दिष्टांशी जोडण्याच्या कटिबद्धतेची ग्वाही दिली. या संदर्भात, ‘नेट झिरो’ कंपनी बनण्याच्या दिशेने ‘लार्सन अँड टुब्रो’ काम करीत आहे. कंपनीच्या कोणत्याही कृतीमुळे हरीत वायूंचे उत्सर्जन नगण्य प्रमाणात होऊन पर्यावरणावर शून्य परिणाम होण्याला, पाण्याची उपलब्धता व मागणी यांतील शाश्वत संतुलन साधण्याला आणि लॅंडफिलसाठी घनकचरा पाठवणे टाळण्याला ‘नेट झीरो कंपनी’ असे म्हटले जाते.
कंपनीने ‘एका चांगल्या जगासाठी शाश्वत प्रगती’ हा आपला चौथा एकात्मिक अहवाल सादर केला आहे. बाह्य वातावरण आणि मूल्य निर्मितीच्या संदर्भात कंपनीची रणनीती, प्रशासन, कामगिरी आणि संभाव्यता यांची माहिती या व्यापक स्वरुपाच्या दस्तावेजातून मिळते.
गेल्या अनेक वर्षांपासून, हवामानविषयक कार्य, वर्तुळाकार अर्थव्यवस्था, हरित उपाययोजना, हरित पुरवठा साखळी, कर्मचारी व समाजकल्याण, कामगारांचे आरोग्य व सुरक्षा यांसारख्या ‘ईएसजी’च्या निकषांवर ‘एल अँड टी कंपनीने लक्ष केंद्रित केलेले आहे. जगभरात हवामानामध्ये होणारे सततचे बदल हा 21व्या शतकातील सर्वात मोठा धोका ठरू लागला आहे. या हवामान बदलाचा मोठा फटका बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्राला बसत असतो आणि याच क्षेत्रांत एल अँड टी कार्यरत असल्याने, एनएपीसीसी, टीसीएफडी आणि इतर तत्सम मार्गदर्शक अशी हवामानाशी संबंधित धोरणे तिने आपल्या व्यवसायात समाविष्ट केलेली आहेत.
सुधारित संसाधन कार्यक्षमता आणि महत्वाच्या नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यातून या क्षेत्रांमध्ये अग्रणी बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीद्वारे वापरल्या जाणाऱ्या एकूण विजेपैकी 10 टक्क्यांपेक्षा जास्त वीज अक्षय स्त्रोतांमधून येते. कंपनीने 2008पासून एकत्रितपणे 128 दशलक्ष केडब्ल्यूएच इतकी ऊर्जा वाचवली आहे, जी 60 हजार घरांना एका वर्षासाठी वीज पुरवण्याइतकी आहे. ऊर्जा संवर्धनाचे उपाय आणि अक्षय ऊर्जा यांच्या माध्यमातून कंपनीने, 21 या आर्थिक वर्षात, 33,500 टन इतक्या कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन टाळले आहे.
पाणी व्यवस्थापनाच्या आघाडीवर, एल अँड टी गेल्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. 2021 या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने 57 टक्के सांडपाण्याचे री-सायकलिंग करून त्याचा फेरवापर केला आहे. कंपनी मटेरियल ‘री-सायकलिंग’वरही भर देत आहे. सन 2008पासून, कंपनीने एकत्रितपणे 43,068 टन इतके ‘री-सायकल्ड स्टील’ आणि 2.4 दशलक्ष टन इतकी ‘फ्लाय अॅश’ वापरली आहे. आज या कंपनीमध्ये 22 टक्के ‘इनपुट सामग्री’ री-सायकल्ड किंवा पर्यावरणास अनुकूल अशा स्त्रोतांमधून येते. कंपनी सादर करीत असलेले हरीत उपाय (ग्रीन ऑफरिंग्ज) 277 अब्ज रुपयांचे, म्हणजे तिच्या उत्पन्नाच्या 29.6 टक्के इतके आहेत. निसर्ग संवर्धन आणि जैवविविधतेला प्रोत्साहन याकडे कंपनी प्रामुख्याने लक्ष देते. ‘एल अँड टी’तर्फे गेल्या दशकभरापासून वृक्षारोपण केले जात आहे. कंपनीकडे 6 ठिकाणी शहरी जंगले आहेत, तसेच कंपनीच्या विविध कॅम्पसमध्ये दीड लाख इतकी पूर्ण वाढलेली झाडे आहेत. वर्षभरात कंपनीने सुमारे 10 लाख रोपे आणि एकूण 33 लाख झाडे लावली आहेत. त्याचप्रमाणे, सुरक्षेच्या आघाडीवर, कंपनी अति-जोखमीच्या क्रियांवर लक्ष केंद्रित करत आहे. डिजिटल एआय तंत्रज्ञानाच्या वापरासह इतर अनेक उपायांनी कंपनीच्या सुरक्षा कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होण्यास मदत झाली आहे.
शाश्वत मूल्य निर्मिती
आपले भागधारक, गुंतवणूकदार, ग्राहक, कर्मचारी व सामाजिक भागधारक या सर्वांसाठी मूल्य निर्माण करणे हा ‘एल अँड टी’च्या धोरणाचा केंद्रबिंदू आहे. यामध्ये आर्थिक लाभ, सामाजिक दायित्वे पूर्ण करणे आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचबरोबर एल अँड टीचा ब्रॅंड पुढे नेणे या गोष्टी करण्यात येतात. हा संपूर्ण आणि एकात्मिक दृष्टीकोन तिच्या सहा भांडवलांवर आधारित मूल्य निर्मितीच्या मॉडेलवर लागू होतो – आर्थिक भांडवल, उत्पादित भांडवल, बौद्धिक भांडवल, मानवी भांडवल, नैसर्गिक भांडवल आणि सामाजिक व संबंध भांडवल. या सहाही भांडवलांच्या अनुषंगाने, मनुष्यप्राणी, पृथ्वीतल आणि आर्थिक नफा यांच्यात सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न कंपनी करीत असते.
ईपीसी, हाय-टेक मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस या क्षेत्रांतील भारतातील आघाडीचा समूह असल्याने, एल अँड टी शाश्वत वाढ साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान आणि नाविन्यता यांचा उपयोग करीत असते. मालमत्तांचा मागोवा घेण्यासाठी व त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी डिजिटल चिपसेट; तसेच भू-स्थानिक तंत्रज्ञान, लीडार आणि ड्रोन-आधारित सर्वेक्षण यांच्या सहाय्याने ‘एल अँड टी’ने टाळेबंदीच्या काळात आपल्या साईटवरील डेटा मिळविण्यात व त्यावर देखरेख ठेवण्यास यश मिळविले. एल अँड टीच्या हरीत उपायांमध्ये, प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्प, अक्षय बाबींवर आधारीत सोल्यूशन्स, पाणी व सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, कार्यक्षम वीज वितरण, मास ट्रान्झिट सिस्टम आणि ग्रीन बिल्डिंग या गोष्टी समाविष्ट आहेत.
लोकांचे कल्याण हाच गाभा – सामाजिक उपक्रम
सामाजिक आघाडीवर या कंपनीने समाजातील 12 लाख लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविले आहे आणि शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि पाणी व स्वच्छता यासाठी 150 कोटी रुपये खर्च केले आहेत. याव्यतिरिक्त, ‘माइंडट्री’, ‘एलटीआय’, ‘एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’ (एलटीटीएस) आणि ‘एल अँड टी फायनान्स होल्डिंग्स’ (एलटीएफएच) यांनी या वर्षभरात सीएसआर उपक्रमांसाठी 80 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. समुहाच्या पातळीवर, एल अँड टीने कोविड साथीच्या काळात ‘पीएम केअर्स’ फंडासाठी 150 कोटी रुपये दिले आहेत आणि कोविडच्या उपचारांसाठीच्या उपक्रमांमध्ये 39 कोटी रुपये खर्च केले आहेत.
कोविड साथीदरम्यान कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवण्यात ‘एल अँड टी’च्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि प्रकल्प प्रभावीपणे वितरीत केले. सतत शिकण्यास प्रोत्साहित करून, सर्वसमावेशकता व समानतेला उत्तेजन देऊन आणि निरोगी व सुरक्षित कार्यस्थळ सुनिश्चित करून कामाचे वातावरण तयार करण्याचे ‘एल अँड टी’चे प्रयत्न कायम सुरू असतात.
कार्बनचे कमी उत्सर्जन व पाण्याची बचत यांबाबत कटिबद्धता
आपल्या महत्वाकांक्षा पुढील स्तरावर नेत कंपनीने हवामान बदल आणि जल सुरक्षिततेशी संबंधित मोठी उद्दिष्टे बाळगली आहेत. पॅरिस कराराच्या 2050पर्यंतच्या अंतिम मुदतीपूर्वीच, 2040पर्यंत कार्बन न्यूट्रलिटी व 2035पर्यंत वॉटर न्यूट्रलिटी प्राप्त करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.
‘माइंडट्री’, ‘एलटीआय’,’ एलटीटीएस’ आणि ‘एलटीएफएच’ या ‘एल अँड टी’च्या मुख्य उपकंपन्यादेखील या संदर्भात अर्थपूर्ण कृती करीत महत्वाकांक्षी लक्ष्य बाळगत आहेत. माइंडट्री, एलटीआय, एलटीटीएस यांनी 2030पर्यंत ‘कार्बन न्यूट्रल’ आणि ‘वॉटर न्यूट्रल’ बनण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे ‘एलटीएफएच’ने 2035पर्यंत ‘कार्बन न्यूट्रल’ बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
| कटिबद्धता | एल अँड टी | माइंडट्री | एलटीआय | एलटीटीएस | एलटीएफएच |
| कार्बन न्यट्रलिटी | 2040 | 2030 | 2030 | 2030 | 2035 |
| वॉटर न्यूट्रलिटी | 2035 | 2030 | 2030 | 2030 | 2022 |
याप्रसंगी बोलताना एल अँड टी चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रह्मण्यन म्हणाले, “ईएसजीबाबतचा आमचा दृष्टीकोन, धोरण, चौकट, आराखडा आणि कृती योजना यांची मांडणी आम्ही या ठिकाणी करीत आहोत. ईएसजीच्या आमच्या आराखड्यात, लक्ष्य 2026 ही 5 वर्षांची धोरणात्मक योजना समाविष्ट आहे. यामध्ये हवामानविषयक नेतृत्व, जलव्यवहार, वर्तुळाकार अर्थव्यवस्था, हरित पुरवठा साखळी, जैवविविधता आणि हरीत उपाय यांविषयीची आमची बांधिलकी स्पष्ट दिसून येईल. ‘ईएसजी’च्या संदर्भात जागतिक पातळीवर चालणाऱ्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, आम्ही नवीन उंची गाठण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षांमध्ये एक पाऊल पुढे टाकण्याची तयारी करीत आहोत.”
महत्त्वाच्या उद्योगांमध्ये ‘एल अँड टी’चे उपक्रम केवळ महत्त्वपूर्ण आर्थिक आवश्यकता पूर्ण करण्यातच मदत करणार नाहीत, तर लोकांचे जीवनमान अनेक प्रकारे सुधारतील आणि भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करतील.
पार्श्वभूमी:
लार्सन अँड टुब्रो ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ईपीसी प्रकल्प, हाय-टेक मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवांमध्ये ती गुंतलेली आहे. जगभरातील 50हून अधिक देशांमध्ये ती कार्यरत आहे. एक मजबूत, ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन आणि उच्च गुणवत्तेच्या शोधात सतत असल्यामुळे, गेल्या आठ दशकांत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये नेतृत्व प्राप्त करण्यास आणि ते टिकवून ठेवण्यास एल अँड टी सक्षम ठरली आहे.















