मुंबई, विशेष प्रतिनिधी : नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या कार्यालयाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या ‘रक्तदान’ शिबिराचे उद्घाटन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
राज्यात कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाने सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत रक्तदान शिबिर राबवण्याचा निर्णय घेतला. यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे, उपनियंत्रक शिधावाटप ज्ञानेश्वर जवंजाळ,उपनियंत्रक शिधावाटप मनोहर कडवे, निरीक्षक किरण जामसांडेकर, निरीक्षक किरण सुर्वे, कल्याणी देसाई, सलमा खान, संदीप केणी हे उपस्थित होते. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी रक्तदान शिबिराची पाहणी केली व रक्तदान करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्याशी संवाद साधत विचारपूस केली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवडा भरून काढण्यासाठी सुरू केलेल्या ह्या उपक्रमाला भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी देखील रक्तदान केले. रक्तदान केलेल्या कर्मचारी आणि अधिकारी यांना भुजबळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रकाचे वितरण करण्यात आले.