मालाड, प्रतिनिधीः प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सलाम मुंबई फाउंडेशन, नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन आणि रॉबिन हुड अकॅडमीद्वारे ‘एक झाड कोरोनायोद्धयांसाठी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रम मुंबईतील 28 मनपा शाळा, 3 पोलीस ग्राउंड आणि 2 मनपा कार्यालयांच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता.
22 ते 25 जानेवारी ह्या दिवसांत आयोजकांद्वारे एकूण 300 रोपे लावण्यात आली. ह्यात प्रामुख्याने भारतीय झाडांचा समावेश करण्यात आलेला आहे. उपक्रमात मनपा शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि अधिकारी सहभागी झाले होते. ह्याप्रसंगी विद्यार्थ्यांना आपल्याही परिसरात भारतीय वृक्ष लावण्याची, त्यांना जगविण्याची, आपला परिसर स्वच्छ आणि रोगमुक्त,सुंदर ठेवण्याचा संदेश देण्यात आला. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या मुंबईच्या दक्षिण विभागातील 25 क्लीनअप मार्शल्सचा वृक्ष देऊन आयोजक संस्थांद्वारे सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी सलाम मुंबई फाउंडेशनचे सहाय्यक व्यवस्थापक (मानव संसाधन) अक्षय आंबेरकर म्हणाले की सध्या संपूर्ण जगच कोरोना महामारीच्या कचाट्यात सापडले आहे; तरीही जीवावर उदार होऊन ‘कोरोनायोद्धे’ माणुसकी जपण्याचे कार्य करीत आहेत आणि आपल्याला प्रेरणा देत आहेत. कोरोनायोद्ध्यांना सलाम करण्यासाठी, कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी, आपली पृथ्वीमाता सुदैव सुंदर आणि हिरवीगार रहावी ह्यासाठी आम्ही तीन संस्था मिळून ‘एक झाड कोरोनायोद्धयांसाठी’ उपक्रम राबवीत आहोत. अशा समाजोपयोगी उपक्रमांत आम्हाला मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांचा सदैव पाठिंबा मिळत असतो.