रत्नागिरी : जिल्हा क्रिडा परिषदेच्या निधीतून जिल्हयात क्रिकेट, खो-खो, कबड्डी यासारख्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर स्पर्धेचे आयोजनबाबत वर्षभराचे नियोजन सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी आज त्यांच्या दालनात आयोजित जिल्हा क्रिडा संकुल कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, उत्तर रत्नागिरी सा.बां. चे कार्यकारी अभियंता पाताडे, सा.बां. विभागाचे शाखा अभियंता जनक धोत्रेकर, जिल्हा क्रिडा अधिकारी मिलींद दिक्षीत आदि मान्यंवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी जिल्हयात खो-खो, कबड्डी, क्रिकेट यासारखे जे खेल मोठया प्रमाणात खेळले जातात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करावे. तसेच वर्षभरात जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर कोणत्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत त्याचे नियोजन सादर करण्याच्या सूचना त्यांनी क्रिडा विभागाला दिल्या .जलतरण तलावावर देखील जीवरक्षक नेमणे गरजेचे असून जलतरण तलावात पोहण्यासाठी नियमावली तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच एमआयडीसी , मिरजोळे येथील जिल्हा क्रिडा संकुल च्या बांधकामाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.