
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती – कायदेतज्ज्ञांची विशेष उपस्थिती
नाशिक (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण विद्याशाखेच्या वतीने ‘कार्यालयीन सहाय्यक (न्यायिक) लिपिक संवर्ग पदविका’ या विशेष शिक्षणक्रमाचा शुभारंभ रविवारी दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती श्री. संदीपकुमार मोरे व न्यायमूर्ती श्री. अभय मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते.
व्यासपीठावर महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलचे अध्यक्ष श्री. हर्षद निंबाळकर, नाशिकचे प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री. श्रीचंद जगमलानी, निफाडचे जिल्हा न्यायाधीश श्री. अ. अ. अ. शेख, विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, निफाड वकील संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ अँड. इंद्रभान रायते, विद्यापीठाचे निरंतर शिक्षण विद्याशाखा आणि व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास विद्याशाखा संचालक प्रा. डॉ. जयदीप निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना न्यायमूर्ती श्री. संदिपकुमार मोरे म्हणाले की डॉक्टर्स – इंजिनियर्स असे पारंपारिक शिक्षणक्रमांव्यातिरिक्त अनेक कौशल्याधिष्ठीत कामे आहेत, ज्याचे रीतसर प्रशिक्षण घेवून युवकांना चांगला रोजगार मिळू शकतो. मुक्त विद्यापीठाने ‘कार्यालयीन सहाय्यक (न्यायिक) लिपिक संवर्ग पदविका’ शिक्षणक्रमाचा शुभारंभ करून चांगले व बहुमोल कार्य केले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच यापुढे लघुलेखक (स्टेनो) विषयी शिक्षणक्रम आणि इतर काही दुर्लक्षित परंतु महत्वपूर्ण शिक्षणक्रमांकडे वळावे असे आवाहन केले. न्यायमूर्ती श्री. अभय मंत्री यांनी मुक्त विद्यापीठाने न्यायव्यवस्थेच्या नेमक्या गरजा ओळखून हा शिक्षणक्रम सुरु केल्याचे गौरवोद्गार काढले. या शिक्षणक्रमामुळे शहरी व ग्रामीण विद्यार्थ्याना एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच यामुळे न्यायालयीन कामकाज करणाऱ्या व्यक्तींच्या कामकाजात अधिक सुलभता येणार असल्याचे सांगितले. अध्यक्षपदावरून बोलताना विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी अशा अभ्यासक्रमामुळे न्यायालयीन कामकाजात अचूकता आणि गती येईल, असा विश्वास व्यक्त केला. भविष्यात अशा प्रकारचे इतरही कौशल्यधिष्ठित, व्यावसायिक व रोजगाराभिमुख शिक्षणक्रम सुरु करण्यात येतील असे अआश्वासन दिले. तसेच भविष्यात विद्यापीठातर्फे विधी शाखेचा शिक्षणक्रम सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी बार कौन्सिलचे व संबंधितांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्री. जयंत जायभावे यांनी मुक्त विद्यापीठ हे सर्व थरातील विद्यार्थ्यांसाठी पंढरपूर असल्याचे अभिमानाने सांगितले. तसेच या शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांना अगदी माफक शुल्कात कायदेविषयक दस्तावेज असेलेली ‘वेबबँक’ उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन दिले. महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलचे अध्यक्ष श्री. हर्षद निंबाळकर यांनी राज्यभरातील वकिलांनी आपल्याकडील सहाय्यक सेवक वर्गास या शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यास प्रोत्साहित करावे असा ठराव करण्यात येईल असा निर्धा र्व्याक्त केला. तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांना बार कौन्सिलचे सिव्हील व क्रिमिनल मॅन्युअल सहजरित्या उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन दिले. नाशिकचे प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री. श्रीचंद जगमलानी यांनी न्यायिक प्रक्रियेत प्रशिक्षित लिपिक वर्गाचे महत्त्व अधोरेखित केले. निफाडचे जिल्हा न्यायाधीश श्री. अ. अ. अ. शेख यांनी या शिक्षणक्रमामुळे संबंधितांना कायदा व कायद्याची प्रक्रिया समजून घेण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य श्री. सागर वैद्य यांनी मुक्त विद्यापीठ नाविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आगेकूच करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अँड. इंद्रभान रायते यांनी सदर शिक्षणक्रम विकसनाची पार्श्वभूमी व प्रवास कथन केला.
आपल्या प्रास्ताविकात डॉ. जयदीप निकम यांनी या पदविका शिक्षणक्रमाच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकला. मान्यवरांच्या हस्ते या नवीन शिक्षणक्रमाच्या चार पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. बार कौन्सिलचे सदस्य, नाशिक जिल्ह्यातील न्यायाधीश, विविध वकील संघांचे अध्यक्ष आणि विधी महाविद्यालयातील प्राध्यापकांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने झाली तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मान्यवरांचा परिचय डॉ. माधुरी खर्जुल यांनी करून दिला. कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यातील वकील, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यापीठ अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
सदर शिक्षणक्रम हा एक वर्षे मुदतीचा व २४ क्रेडीटचा पदविका शिक्षणक्रम आहे. त्यात न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर व इतिहास, सामान्य ज्ञान, कार्यालयीन सहाय्यक आणि प्रात्यक्षिक असे चार विषय आणि तशी पुस्तके आहेत. याविषयीची अधिक माहिती ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.















