
अशा तरुणाईला रोखण्यासाठी काही कार्यकर्त्याचे पोलिसांना निवेदन
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : स्मार्टफोनवर ऑनलाईन जुगाराचा सुळसुळाट होतांना दिसून येतो. बाजारात टपऱ्या आणि दुकानांमध्ये अशा चालणाऱ्या ऑनलाईन जुगाराच्या अड्ड्यांवर अनेक जण आकर्षित होत आहेत. याप्रकारात नोकरदार, व्यावसायिकांचा समावेश आहेच पण आता शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा भरणा अधिक आहे. सायबर पोलिसांना ही बाब लक्षात आली आहे. तक्रारीसुद्धा त्यांच्यापर्यंत गेल्या आहेत. पण कायद्याने बंदी नसल्याने कल्याण-डोंबिवलीच्या अनेक भागांत ऑनलाईन जुगाराचे अड्डे आहेत. तरूणाईची यामध्ये जवळीक होत आहे. यामुळे अशा जुगारावर बंदी घालण्याची मागणी होत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डोंबिवली विधानसभा क्षेत्र कमिटीचे कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
या प्रकरणी कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी पोलिसांचे लेखी तक्रारीद्वारे लक्ष वेधले आहे. या संदर्भात पाटील यांनी ऑनलाईन मटका/जुगार अड्डे चालविणाऱ्या काही माफियांची नावेही या निवेदनात नमूद केली आहेत. डोंबिवलीत दोन कुख्यात मटका किंग असून या जुगार माफीयांनी संगनमत करून लॉटरीच्या नावाखाली शहरात राजश्री व सुपर लोटोचे बोर्ड दुकानांवर लाऊन ठिकठिकाणी ऑनलाईन मटका/जुगाराचे अड्डे थाटले आहेत. शहरातील चौकाचौकांतील दुकानांतून सुरू असलेल्या या अड्ड्यांवर ही दूकली लोकांची दररोज लाखो रूपयांची फसवणूक करत आहे. विशेष म्हणजे गेल्या 4 महिन्यांत त्यांनी स्वतः ऑनलाईन मटका चालवण्याचा सॉफ्टवेअर बनवले असून त्या माध्यमातून जुगार-मटक्याकडे आकर्षित होणाऱ्या लोकांची फसवणूक करून कोट्यवधीची माया जमवली आहे. हेच माफीया अशा प्रकारे अनधीकृतपणे व्यवसाय करून शासनाचा लाखो रूपयाचा महसूल बुडवत आहेत. गेल्याच महिन्यात यापैकी एकावर डोंबिवली विष्णूनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याचे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
अशा अड्ड्यांचे जाळे स्टेशन परिसरात, तसेच सर्वसामान्यांची लोकवस्ती असलेल्या भागात थाटले आहेत. या जुगारात महाविद्यालयीनच नव्हे तर शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुरफटत चालली असून देशाचे उज्वल भवितव्य उध्वस्त होताना दिसत आहे असेही पाटील सांगतात.














