राजापूर/प्रतिनिधी दि.०६:राजापूर तालुक्यातील ओणी कोव्हिड सेंटर येथे ट्राम केअर सेंटर सुरु करणेबाबत आमदार डॉ. राजन साळवी यांनी आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांना निवेदन देऊन मागणी केली असता आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांनी सकारत्मकता दर्शवली.कोरोना महामारीच्या काळात राजापूर तालुक्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गावर ओणी येथे आरोग्य विभागाच्या मालकीच्या इमारतीमध्ये २० बेड व ५ आय.सी.यु बेड असे अद्यावत कोव्हिड हॉस्पिटल सुरु करण्यात आले असून त्यासाठी रुपये १ कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे. परंतु सद्यास्थितीत कोरोनचा प्रादुर्भाव कमी झाला असुन रुग्ण नसल्याने सदर हॉस्पिटल बंद स्थितीत आहे.
ओणी या ठिकाणी सुपर मल्टीस्पेशल हॉस्पिटल होणेसाठी बांधकाम विभागाने आरोग्य विभागाला जागा वर्ग केली असुन शासन स्तरावर निधीची तरतूद झाली तर भविष्यामध्ये सदर ठिकाणी सुपर मल्टीस्पेशल हॉस्पिटल उभे राहणार आहे. परंतु सदर हॉस्पिटल उभे राहण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार आहे.
त्यामुळे त्यानुषंगाने आमदार डॉ.राजन साळवी यांनी मुंबई-गोवा महामार्गावर होणा-या अपघाताची संख्या पाहता अपघात रुग्णांसाठी ओणी येथील जे कोव्हिड हॉस्पिटल उभे केलेले आहे त्या इमारतीमध्ये ट्रामा केअर सेंटर सुरू करणेच्या अनुषंगाने अद्यावत यंत्रणा व कर्मचारी वर्गासह मंजूरी मिळण्याची मागणी आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांची प्रत्येक्ष भेट घेऊन केली.
आमदार डॉ.राजन साळवीच्या मागणीचा विचार करता आरोग्य मंत्र्यांनी संबंधिताना माहिती घेऊन ओणी कोव्हिड सेंटर येथे ट्राम केअर सेंटर सुरु करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.















