रत्नागिरी : गेल्या वर्षभरामध्ये पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकारी व कर्मचायांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले, त्यांच्या स्मृतीस आज (रविवार) आदरांजली वाहण्यात आली. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे वतीने पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथील कवायत मैदानावर अपर पोलीस अधीक्षक श्री.मितेश घट्टे यांचे प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. झाला. दिनांक 01/09/2017 ते 31/08/2018 या कालावधीत भारतामध्ये एकुण 419 पोलीस अधिकारी व जवान यांनी कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करले व शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील 03 पोलीस जवानांनी कर्तव्य बजावीत असताना प्राणार्पण केलेले आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) महादेव वावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक ढाकणे यांचेसह पोलीस अधिकारी व कर्मचारी, नागरीक, वकील वर्ग, पत्रकार, सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कुलचे एन.एन.सी.चे विदयार्थी उपस्थित होते.
लडाखमधील हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील 10 शूर शिपायांवर दिनांक 21 ऑक्टोबर 1959 रोजी चीनच्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलीसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला व सरहद्दीचे रक्षण करताना प्राण गमावले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस प्रतिवर्षी भारतभर “पोलीस स्मृतीदिन” म्हणून पाळण्यात येतो.