मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत आपण सगळ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने करुया असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, एकविसाव्या शतकातील पहिली 19 वर्षे कशी गेली, कोणत्या गोष्टी साध्य झाल्या अन् कोणत्या राहिल्या हे बाजूला ठेवूया आणि महाराष्ट्राला आनंदी, सुखी-समाधानी बनविण्यासाठी प्रयत्न करूयात. येणारे वर्ष महाराष्ट्रासाठी नवीन आशा, आकांक्षा आणि नवी उमेद घेऊन आले असून सर्वांनी मिळून आपल्या राज्याला आणखी पुढे नेऊया. राज्याला प्रगतीपथावर नेताना गोर-गरीब आणि दुर्बल लोकांना हाताला धरून पुढे नेऊया. पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच शेतकरी, कामगार, रोजीरोटी कमावणारा मजूर आनंदी होण्यासाठी प्रयत्न करुया. महिला, मुलं सुरक्षित आणि समाधानी असण्याबरोबरच प्रत्येकाच्या हाताला रोजगार, जगातले सर्वोत्तम शिक्षण, सर्वांना परवडणारे आणि सहज उपलब्ध होणारे आरोग्य देण्यासाठी उत्तम व्यवस्था निर्माण करूया.