मुंबई : ओला आणि उबेर टॅक्सी सेवेच्या चालक आणि मालकांनी मागील ११ दिवसांपासून पुकारलेला संप आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मध्यस्तीनंतर मागे घेण्यात आला. मंत्री रावते, माजी मंत्री आणि इंटकचे अध्यक्ष सचिन अहीर, ओला-उबेर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक – मालक संघटना यांच्यादरम्यान आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. त्यानंतर संप संस्थगित करण्यात येत असल्याचे चालक –मालक संघटनांच्या प्रतिनिधींनी जाहीर केले.
सायंकाळी साडेपाच वाजता सुरु झालेली ही बैठक रात्री साधारण पावणेदहा वाजता संपली. बैठकीस परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, अप्पर परिवहन आयुक्त सतिश सहस्त्रबुद्धे, उबेर कंपनीच्या प्रतिनिधी इरावती दामले, अभिनव पटवा, ओला कंपनीचे प्रतिनिधी गोम्स, प्रतिक, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे (इंटक) सरचिटणीस गोविंदराव मोहीते, सचिव सुनिल बोरकर, निवृत्ती देसाई, या संघटनेच्या ओला-उबेर युनिटचे प्रमुख प्रशांत सावर्डेकर, सुधीर भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री रावते यांनी मांडलेल्या सूचनांना ओला-उबेर कंपनी प्रतिनिधी आणि संपकऱ्यांचे प्रतिनिधी या दोहोंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मंत्री रावते म्हणाले की, अॅप बेस्ड टॅक्सीमधून मुंबईसह राज्यातील महानगरांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. फक्त मुंबईत सुमारे ६० हजार चालक – मालकांना यातून रोजगार मिळतो. आता दिवाळी जवळ आली असून या काळात कंपनीसह चालक-मालकांना मोठ्या व्यवसायाची संधी आहे. शिवाय लोकांनाही दिवाळीच्या काळात प्रवासी सेवेची गरज आहे. त्यामुळे कंपनी आणि चालक-मालक संघटनांनी समन्वयाने तोडगा काढून तातडीने संप मिटवावा, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्री रावते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कंपनी प्रतिनिधी आणि चालक – मालक संघटनांनी सुमारे तासभर चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वमान्य तोडग्याची घोषणा करुन संप स्थगित करण्यात येत असल्याचे श्री. सचिन अहीर यांनी जाहीर केले.
चालक – मालकांना त्यांच्या सेवेसाठी कंपनीकडून अधिक दर मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. या मागणीस प्रतिसाद देत दोन्ही कंपन्यांनी चालक – मालकांना इंधनाच्या दरवाढीनुसार दर देण्याचे तत्वत: मान्य केले. तसेच चालक-मालकांचे संपकाळात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी उद्या दि. ३ नोव्हेंबपासून १५ नोव्हेंबरपर्यंत इन्सेंटीव्ह देण्याचेही दोन्ही कंपन्यांनी मान्य केले. आधी हा इन्सेंटीव्ह फक्त चारच दिवस वाढविण्याचे कंपन्यांनी सांगितले होते. पण आकरा दिवसापासून संप सुरु असल्याने तसेच दिवाळीचा सण असल्याने इन्सेंटीव्हचा कालावधी वाढविण्यात यावा, असे मंत्री रावते यांनी सूचविले. त्यांच्या सूचनेस अनुसरुन इन्सेंटीव्हचा कालावधी १५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यास दोन्ही कंपन्यांनी सहमती दर्शविली.
तसेच चालक – मालकांना इंधनाच्या दरवाढीस अनुसरुन नियमीत दर देण्याच्या अनुषंगाने १५ नोव्हेंबरच्या आत बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा, अशी सूचनाही मंत्री रावते यांनी याप्रसंगी केली. त्यासही कंपनी प्रतिनिधींनी प्रतिसाद देत ही बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.