मुंबई, (निसार अली): समुद्राकडून वाहणारे वेगवान वारे, अचानक पडू लागलेला मुसळधार पाऊस, उसळणाऱ्या लाटांचा आवाज आणि संभाव्य ओखी चक्रीवादळ याचा धसका मढ, मार्वे, मनोरी किनाऱ्यावरील ग्रामस्थांनी घेतला आहे.
ओखी येण्याची पूर्वसूचना मिळाल्यामुळे या किनारपट्टीतील मासेमारी पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. 99 टक्के बोटी किनाऱ्यावर परत आल्या आहेत.
पश्चिम उपनगरात मालाडजवळ अकसा, मढ, मनोरी, वर्सोवा, दानापाणी, मार्वे, गोराई हे समुद्र किनारे आहेत. तसेच त्यांना लागून छोटी छोटी गावे वसलेली आहेत. मोठे किनारे तसेच खाडीपट्टीचा परिसरही येथे असल्याने या भागात वेगवान वाऱ्यांची तीव्रता अधिक जाणवत आहे.
तसेच या किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ ही आज कमी होती, अशी माहीती ग्रामस्थांनी दिली.
ओखीमुळे बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात तसेच अंदमानच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या 24 तासात हा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. वेगवान वारे वाहत असल्याने नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे.
मढ-वर्सोवा, मार्वे-मनोरी फेरीबोट सेवा सुरू
मढ-वर्सोवा, मार्वे-मनोरी फेरीबोट सेवा आज दिवसभर सुरूच होती. ओखीच्या इशाऱ्याचा कोणताही परिणाम या सेवेवर झाला नाही. कदाचित उद्या या सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.