
नवी दिल्ली : अरबी समुद्राच्या मध्य पूर्व भागात आज सकाळी साडे अकराच्या सुमाराला “ओखी” चक्रीवादळ धडकले. ताशी 9 किलोमीटर वेगाने आलेले हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून 630 किलोमीटर तर सुरतच्या किनाऱ्यापासून 810 किलोमीटर दूरवरुन जात आहे. हे चक्रीवादळ पुढे ईशान्येकडे सरकेल आणि दक्षिण गुजरात तसेच लगतच्या उत्तर महाराष्ट्र किनाऱ्यावर पोहोचता पोहोचता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्याचा वेग आणखी मंदावेल.
या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात तसेच अंदमानच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या 24 तासात हा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता असून हा पट्टा तामिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याकडेही जाण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळामुळे आज सौराष्ट्र, दक्षिण गुजरातसह महाराष्ट्राच्या उत्तर कोकण आणि मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या राज्यातल्या पालघर, ठाणे, रायगड, बृहन्मुंबई, धुळे, नंदूरबार,नाशिक,जळगांव, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात भागात ताशी 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आज रात्रीपासून ते 6 डिसेंबर सकाळपर्यंत हे वारे वाहण्याची शक्यता आहे. याच काळात उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे मच्छिमारांनी या काळात समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर कोकणातल्या पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई या भागात काही नुकसान होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.















