रत्नागिरी, (आरकेजी) : ओखी चक्रीवादळाबाबत कोकण किनारपट्टीजवळ असणाऱ्या सर्व जिल्ह्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा मिळाला आहे. त्यामुळे हर्णै बंदरातील नौकामालकांनी या वादळाचा फटका नौकांना बसू नये यासाठी ठिकठिकाणच्या खाड्यांचा आधार घेतला आहे. आंजर्ले खाडी सुरक्षित नसून देखील बहुतांशी नौकांनी आंजर्ले खाडीचा आधार घेतला आहे.
ओखी चक्रीवादळाबाबत कोकण किनारपट्टीजवळ असणाऱ्या सर्व जिल्ह्यांना राज्य शासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. याबाबत आर.एस.एम.सी (रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर) अहवालानुसार या ठिकाणी पुढील ४८ तास ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पाऊस व जोरदार वादळाची शक्यता राहील, असा शासनाकडून सतर्कतेचा इशारा दिल्यामुळे हर्णैतील मच्छीमारांची एकच धावपळ उडाली आहे. त्यातच आज पौर्णिमा असल्याने समुद्रात जोरदार उधाण सुरु झाले आहे. त्यातच कालपासून जोरदार वारे वाहत असल्याने, वादळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हर्णैमधील बहुतांश नौका आंजर्ले खाडीत हलविण्यात आल्या आहेत. कारण महिन्यात झालेल्या वादळाच्या जोरदार तडाख्यामुळे ५ नौकांना जलसमाधी मिळाली होती. तशी पुनरावृत्ती यावेळी होऊ नये, यासाठी नौकामालकांनी खबरदारी घेतली आहे. तसेच ज्या नौका मासेमारीसाठी अगोदरच समुद्रात गेलेल्या आहेत, त्यांनाही जवळपास असणाऱ्या खाडीचा आधार घेण्यास नौकामालकांनी आपापल्या खलाशांना मोबाईलवरून संपर्क करून सांगितलं आहे. त्यामुळे काहींनी जयगड, मुरुड-जंजिरा, रत्नागिरी, दिघी तर दाभोळ खाडीचा आधार घेतला आहे. आंजर्ले खाडी गाळाने भरली असल्यामुळे नौका उभ्या करताना मच्छीमारांची दमछाक झाली.
“ओखी वादळासंदर्भात शासनाकडून सतर्कतेचा इशारा मिळाल्यामुळे आम्ही सुक्षिततेच्या दृष्टीने नौका आंजर्ले खाडीमध्ये नेत आहोत. खाडीदेखील गाळ साचल्यामूळे धोकादायक झाली आहे. तरीदेखील गंभीर जोखीम घेऊन आम्ही नौका खाडीत ठेवत आहोत.तसेच बऱ्याचश्या नौकांनी त्या, त्या खाड्यांचा आधार घेतला आहे. शासनाने आता हर्णै बंदराकडे लक्ष द्यावे. १९ सप्टेंबरला झालेल्या घटनेने मच्छीमार प्रचंड धास्तावला आहे, त्यामुळे ती पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने आमच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे.” अशी मागणी यावेळी पाजपंढरीतील मच्छीमार मधुकर चोगले यांनी केली.