डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक विभागात गेले काही दिवस वीज पुरवठा सतत खंडित होण्याच्या घटना वाढल्यामुळे उत्पादन घटत असून उद्योजकांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे उद्योजकांमध्ये अस्वस्थता आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शनिवारी उद्योजकांची संघटना ”कामा” व महावितरण कपंनीचे अधिकारी यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीत महावितरण कपनीच्या अधिकाऱ्यांनी औद्योगिक भागातील वीज पुरवठा खंडित होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. औद्योगिक विभागात विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा बरीच जुनी असल्याचे मान्य केले तसेच इतर अनेक कारणांसह औद्योगिक विभागातील ट्रान्सफामर्र मधील ऑईल चोरीला जात असल्याची कबूली दिली. ऑईल चोरीमुळे वीज पुरवठा खंडित होत असून या सर्व त्रुटींबद्दल आठ दिवसात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
औद्योगिक विभागातील वीज खंडित होण्याच्या संदर्भात स्थानिक आमदार सुभाष भोईर यांच्याकडे तक्रारी गेल्या होत्या. त्यानी डोंबिवलीचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांचेशी चर्चा करुन उद्योजक व कामा संघटनेचे पदाधिकारी यांनी आपसात चर्चा करुन मार्ग काढावा अशी सूचना केली. सोबत शिवसेना कल्याण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी औद्योगिक विभागातील ”कामा ” सघटनेच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत महावितरण कपंनीच्या अधिकाऱ्यांनी वरील कबूली दिली.
कामा संघटनेचे सदस्य श्रीकांत जोशी व मिलींद केळकर यांनी उद्योजकांना होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली. वांरवार वीज खंडित होत असल्याने उत्पादन घटत असून यामुळे उद्योजकांचे नुकसान होत असून तयार उत्पादन वेळेवर पाठवता येत नाही. रासायनिक पदार्थांचे नुकसान होते अशा अनेक तक्ररी सांगीतल्या. अधिक्षक अभियंता सुनील काकडे यांनी प्ररंभी खेद व्यक्त केला. विद्युत पुरवठा करणारी साधन सामुग्री जुनी असून याजागी नवीन उपकरणे बसवण्यात येतील व आठ दिवसात उद्योजकांना अखंडित वीज पुरवठा होईल असे ठाम आश्वासन दिले. देवेन सोनी यांनी आभार मानले या प्रसंगी कामा संघटनेचे अध्यक्ष मुरली अय्यर उपस्थित होते.