मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून अरबी समुद्रात आलेल्या ओखी चक्री वादळाची माहिती मिळाल्यानंतर मंत्रालय नियंत्रण कक्षाने मच्छिमारांसह सर्व संबंधितांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या राज्यातील 2606 बोटींपैकी 2605 बोटी मच्छिमारांसह सुखरुप परत आल्या असून एका बोटीचा पत्ता शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या उपाय योजनांची माहिती पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, नियंत्रण कक्षाचे संचालक राजीव निवतकर आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, चक्री वादळाची माहिती मिळाल्यानंतर मंत्रालय नियंत्रण कक्षाने कोकणातील सर्व जिल्हाधिकारी, तसेच मेरीटाईम बोर्ड, नौदल पोलिस, मत्स्यव्यवसाय विभाग, तटरक्षक दल आदींना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन तुकड्यांना मुंबईत तैनात करण्यात आले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्यांनाही दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे.
वादळामुळे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू यांच्यासह इतर राज्यातून महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील सिंधुदुर्गमधील देवगड बंदरात 63 बोटी (809 मच्छिमार), रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बंदरांत 79 बोटी (1476मच्छिमार) यांनी आश्रय घेतला आहे. या सर्व मच्छिमारांच्या राहण्याची, वैद्यकीय सुविधा तसेच परतीसाठी लागणाऱ्या डिझेलची व्यवस्था राज्य शासन करत आहे. तसेच तटरक्षक दलाच्या मदतीने या मच्छिमारांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.