
रत्नागिरी : जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी व श्रीमान भागोशीशेठ कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाला श्री. अनिलकुमार एम. अंबाळकर, जिल्हा न्यायाधीश – १, रत्नागिरी, श्री. निखिल जी. गोसावी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी, श्री. अनिरुद्ध ए. फणसेकर, जिल्हा सरकारी अभियोक्ता, रत्नागिरी आणि श्री. आशीष जी. बर्वे, प्रभारी प्राचार्य, श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविदयालय, रत्नागिरी यांची प्रमुख उपस्थिती सह न्यायालयातील न्यायीक अधिकारी वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश श्री. निखिल गोसावी यांनी प्रस्तुतचा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतु आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार या कार्यक्रमाद्वारे कायद्याची जनजागृती करून त्यांची माहिती समाजातील विविध स्तरापर्यंत पोहचवणे असा उद्देश असल्याचे त्यांच्या प्रस्ताविकामध्ये सांगितले.
श्री. आशीष जी. बर्वे, प्रभारी प्राचार्य, श्रीमान भागोशीशेठ कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी यांनी कायदाचे महत्त्व तसेच जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून श्री. अनिरुद्ध ए. फणसेकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना उदयोन्मुख होणाऱ्या वकिलांची न्याय खात्यात येण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी आणि वकील झाल्यानंतर निभवाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा. श्री. अनिलकुमार एम. अंबाळकर, जिल्हा न्यायाधीश १, रत्नागिरी यांनी भारताचे संविधान कसे वाचावे व संविधानांतर्गत येणाऱ्या सामाजिक सर्व घटकांशी निगडीत असणाऱ्या तरतुदी समजावून सांगून आपली सर्वांची नाळ संविधानातील हक्क आणि कर्तव्याशी कशी जुळलेली असते याबाबत उदाहरणे सांगत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक श्रीमती. स्मिता कांबळे यांनी केले आणि कार्यक्रमाचा समारोप वंदेमातरमने झाला.