ठाणे : नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत ठाण्याचा नुबैरशाह शेख रौप्य पदकाचा मानकरी ठरला. 18 देशातील सुमारे 661 बुद्धिबळपटू विविध वयोगटातील लढतीत सहभागी झाले होते. नुबैरशाह सहभागी झालेल्या 20 वर्ष वयोगटात त्याच्यासह चार भारतीय इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटूचा समावेश असल्यामुळे या गटात विजेतेपदासाठी चांगली चुरस पहायला मिळाली. स्विसलिग पद्धतीने सात फेरीच्या स्पर्धेतील सहाव्या फेरीअखेर 5 गुणासह दोघे आघाडीवर होते. नुबैरशाहसह इतर चौघाचे चार गुण झाले होते. शेवटच्या फेरीत नुबैरशाहचा सामना भारताच्या इंटरनॅशनल मास्टर कृष्णा तेजाविरुद्ध होता. पांढऱ्या मोहऱ्यानी डावाची सुरुवात करणाऱ्या नुबैरशाहने आक्रमक खेळ करत एकापेक्षा एक अशा सरस चाली रचल्या. त्यामुळे लढतीत शेवटच्या टप्प्यात कृष्णाकडे पराभव मान्य करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. यावेळी सरस टायब्रेकच्या आधारावर नुबैरशाहला रौप्यपदकाचा विजेता म्हणून घोषीत करण्यात आले. गतवर्षी नुबैरशाहने याच गटात सुवर्णपदक जिंकले होते
नुबैरशाहने स्पर्धेतील वरिष्ठ गटातही आपली छाप पाडली. वरिष्ठ गटाच्या नऊ फेऱ्याच्या लढतीत 4 विजय आणि चार बरोबरीसह सहा गुण मिळवले. एम एच साबू सिद्दीक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या नुबैरशाहने या गटात ग्रँडमास्टर प्रविण ठिपसे, ग्रँडमास्टर ललितबाबू आणि ग्रँडमास्टर सुंदरंजन किदम्बी या सारख्या अनुभवी बुद्धिबळपटूंना बरोबरीत रोखले होते. नुबैरशाहला इंडियन ऑईलची क्रीडा शिष्यवृत्ती मिळाली आहे