ठाणे : ताश्कंत, उझबेकिस्तान येथे 16 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात आलेल्या 13 देशाच्या, 246 खेळाडूंचा सहभाग असलेल्या आशियाई युवा (ब्लिट्झ) बुध्दिबळ स्पर्धेत ठाण्याच्या नुबैरशाहने चमकदार कामगिरी करत 20 वर्षाखालील गटात सुवर्णपदकावर देशाचे व आपले नाव कोरले. शिवछञपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेता व इंडियन ऑईलचा क्रीडा शिष्यवृत्तीधारक इंटरनॅशनल मास्टर नुबैरशाह शेख हा मुंबई विद्यापीठाला संलग्न असलेल्या एम् .एच् . साबू सिद्दीक अभियांञिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत आहे.
या स्पर्धेत नुबैरशाहला तिसरे मानांकन लाभले होते. स्पर्धेतील पहिल्या फेरीपासूनच नुबैरशाह आपल्या प्रतिस्पर्ध्यांना एकानंतर एक पराभवाचे धक्के दिले. पाचव्या फेरीत नुैबेरशाहसमोर अव्वल मानांकित उझबेकिस्तानचा इंटरनॅशनल मास्टर नगिमातोव आर्तिक याचे आव्हान होते. यालढतीत नुबैरशाहने पांढर्या मोहर्याने किंग्स इंडियन बी फोर पद्धतीने डावाची सुरुवात केली. त्यानंतर पुढे सरकलेल्या डावाच्या मध्य पर्वात नुबैरशाहने राणीच्या बाजूने जोरदार आक्रमण करून जिंकण्याची परिस्थिती निर्माण करत आर्तिक यास डाव सोडण्यास भाग पाडले. पाचव्या फेरीअखेर नुबैरशाहस अर्ध्या गुणांची आघाडी मिळाली. अव्वल मानांकित खेळाडूस पराभूत केल्याने स्पर्धेतील इतर खेळाडूंवर त्याचा चांगलाच दबाव निर्माण झाला. सहाव्या फेरीत भारताच्याच साई अग्नी जीवितेश याने नुबैरशाहस बरोबरीत रोखण्यास भाग पाडले. सातव्या फेरीत द्वितीय मानांकित उझबेकिस्तानचा इंटरनॅशनल मास्टर ओखिदोव शामसिद्दीन याच्या सोबत कारोकान बचाव पद्धतीने रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या टप्प्यात नुबैरशाहस पराभव पत्करावा लागल्याने सहाव्या फेरीअखेर मिळालेली एक गुणांची निर्णायक आघाडी बरोबरीत आली . त्यामुळे स्पर्धेत चांगलीच रंगत वाढली. यानंतर आठव्या फेरीत तजाकिस्तानचा करमशोएव शफिक व नवव्या फेरीत भारताच्याच षण्मुख पुली याना पराभूत करुन सुवर्ण पदकासाठीची शर्यत कायम ठेवली .अशा रीतीने नवव्या फेरीअखेर 7.5 गुणांची कमाई करुन सरस टायब्रेकच्या आधारे आर्तिक यास द्वितीय स्थानावरढकलून सुवर्णपदकास गवसणी घातली. नुबैरशाहचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकूण 17 वे आंतरराष्ट्रीय पदक आहे.