मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पासाठी काढण्यात आलेली भूसंपादन प्रक्रियेची अधिसूचना रद्द करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. या निर्णायामुळे शेतकऱ्यांच्या सातबारावर असलेले एमआयडीसीचे शिक्केही हटवले जाणार आहेत. ज्या भागात या प्रकल्पासाठी स्थानिक जनता अनुकूल असेल, अशा ठिकाणी हा प्रकल्प उभारणे शक्य होईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
देसाई म्हणाले,नाणार प्रकल्पक्षेत्रातील १४ ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर करून घेतले होते. तसेच नाणार परिसरातील रहिवासी, कोकणातील पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाविरोधात तीव्र भूमिका घेतली होती, रत्नागिरी येथे जाहीर सभेत नाणार येथील भूसंपादन प्रक्रिया रद्द करत असल्याची घोषणा करण्यात आली होती. आज ही प्रक्रिया विना अधिसूचित करण्याचा निर्णय उद्योगमंत्र्यांनी घ्यावा असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली.
लवकरच एमआयडीसीकडून सर्व तपशील पूर्ण करून राजपत्र प्रसिद्ध केले जाईल. जनतेवर हा प्रकल्प लादणार नाही, हा शब्द पाळल्याचे देसाई यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील १४ गावांतील सुमारे पंधरा हजार एकर जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली होती. ती आता रद्द झाली आहे.