रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत झोनल आँफिसर आहे, तुम्हाला नोकरी लावतो असे सांगून चंद्रपुरातील एका भामट्याने खेड तालुक्यातील सात तरुणांना २६ लाखांना गंडविल्याची घटना समोर आली आहे. आर्यन पाटील असे आरोपीचे नाव असून तो फरार झाला आहे.
पाटील हा खेड शहराजवळच रहात होता. जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक पदासाठी नोकरीला लावू शकतो असा विश्वास त्याने निर्माण केला. त्याच्या भुलथापांना सुरज आणि हर्षद मोहिते हे दोन सख्खे भाऊ बळी पडले. या दोघांप्रमाणे खेड तालुक्यातील असगणी, आंबवली, मुर्डे अशा विविध गावातील सात जणांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीली लावतो असं सांगून पाटीलने २६ लाख उकळले. सर्व व्यवहार त्याने रोखीत केला. इतकेच नव्हे बँकेची खोटी नियुक्ती पत्रे सुद्धा त्याने दिली. बरेच दिवस झाले तरी नियुक्ती होत नाही, तेव्हा आपली फसवणुक झाल्याचे सात जणांना समजले. त्यानंतर त्यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तोपर्यंत आर्यन पाटील फरार झाला. खेड पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तीन लाखांपासून ते सात लाखांपर्यत बेरोजगार मुलांनी त्याला रोखरक्कम दिली आहे.