
80व्या ‘हिरोशिमा दिना’निमित्त सुमारे 650 विद्यार्थ्यांनी घेतली ‘अणुमुक्त व शांततामय समाजरचने’साठी शपथ
“विश्वभरातील शांतीप्रिय लोकांबरोबर आज आम्ही शपथ घेतो की, पृथ्वीवरून आण्विक शस्त्र व इतर शस्त्रास्त्रांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहू…” …मुंबईतील समाजसेवी संस्था आणि शांतीप्रिय नागरिकांच्या साथीने, एस.एन.डी.टी. व मुंबई विद्यापीठाच्या 28 महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन.एस.एस.) सुमारे 650 विद्यार्थ्यांनी आज, दि. 6 ऑगस्ट 2025 रोजी, ‘हिरोशिमा शांती दिना’निमित्त आयोजित शांतता यात्रेत ‘अणुमुक्त व शांतीमय समाज रचने’साठी कार्य करण्याची शपथ घेतली.
या शांतता यात्रेची सुरुवात दुपारी 3 वाजता आझाद मैदान येथून झाली आणि हुतात्मा चौक येथे 3:30 वाजता समाप्त झाली. विद्यार्थ्यांनी रंगभूषा व प्रभावी पोस्टर्सच्या माध्यमातून अणुबॉम्बच्या भीषण परिणामांचे जिवंत चित्रण सादर करत नागरिकांमध्ये जनजागृती केली. याशिवाय ‘युद्ध नको-शांति हवी, ‘नो मोअर हिरोशिमा’, ‘बॉम्ब नको, शांति हवी’ यासारख्या घोषणांचे फलकही विद्यार्थ्यांच्या हाती होते. ही शांतियात्रा हुतात्मा चौक येथे पोहोचल्यानंतर डॉ. हुबनाथ पाण्डेय, निवृत्त प्राध्यापक, मुंबई विद्यापीठ आणि जयंत दिवाण, ट्रस्टी, मुंबई सर्वोदय मंडळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित नागरिकांना ‘शांततामय व अणुमुक्त समाजासाठी’ कटिबद्ध राहण्याची शपथ दिली.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान, 6 व 9 ऑगस्ट 1945 रोजी, अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब हल्ले केले होते ज्यात लाखो निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले तर त्यानंतरच्या कित्येक पिढ्यांना त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले. या हृदयद्रावक घटनेच्या स्मरणार्थ मुंबई सर्वोदय मंडळातर्फे, मुंबई व एस.एन.डी.टी. विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने मागील 34 वर्षांपासून दरवर्षी ही शांतता यात्रा आयोजित केली जाते.
अण्वस्त्रांच्या भीषण परिणामांबद्दल जनजागृती निर्माण करणे आणि शांतता व अहिंसेच्या मूल्यांप्रती सामूहिक बांधिलकी व्यक्त करणे, हा या शांतता यात्रेचा मुख्य उद्देश होता. या शांतीयात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रबळ जनसमर्थन, आणि गांधीवादी शांततेचा कालातीत संदेश यामुळे आजच्या अस्थिर जगातही अहिंसात्मकतेच्या तत्त्वांची प्रासंगिकता अधोरेखित झाली.
















