मुंबई : महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्य असून या पुढील काळात राज्यातून एकही उद्योग इतर राज्यांमध्ये जाऊ देणार नाही. उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे फास्ट ट्रॅकवर निराकरण करून राज्यात वैविध्यपूर्ण औद्योगिक विकास करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आज सह्याद्री अतिथीगृह येथे मान्यवर उद्योजकांसमवेत संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. सीआयआयच्या सहकार्याने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन,पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित उद्योजकांनी महाराष्ट्रातील औद्योगिक वातावरण अनुकूल असून नवीन शासनाकडून उद्योगांच्या समस्यांचे अधिक गतीने निराकरण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
शेती, शिक्षण, रोजगार मध्ये योगदान हवे
मुख्यमंत्री त्यांच्याशी संवाद साधताना म्हणाले की, आमचे सरकार हे कुठल्याही विकासकामांना स्थगिती देणार नसून उलटपक्षी महत्त्वाचे प्रकल्प अधिकाधिक जलदगतीने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे सरकार केवळ आमचे नसून तुमचे सगळ्यांचे आहे आणि त्यामुळे शेती, शिक्षण, रोजगार या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी उद्योजकांनी मोठे योगदान द्यावे.
गेल्या काही वर्षांमध्ये काही कारणांमुळे काही उद्योग राज्याबाहेर गेले असतील परंतु आता एकही उद्योग बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्याचप्रमाणे बाहेरील राज्यांमधील चांगले उद्योग देखील महाराष्ट्रामध्ये कसे सुरु होतील यासाठी त्यांना आकृष्ट करण्यात येईल. जमिनीची किंमत, वीज दर, रस्त्यांची तसेच इतर पायाभूत सुविधांची परिस्थिती आणि विविध परवानग्या गतीने मिळणे यासंदर्भात उद्योग विभागाला तसेच संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना निर्देश देण्यात येऊन त्याप्रमाणे अडचणी दूर करण्यात येतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शहरांना ओळख देणार
मुंबईसह संपूर्ण राज्यात पर्यटनाला अधिक गती देण्यात येऊन राज्यातील शहरांची एक चांगली ओळख करण्याचा मानसही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रात दर्जेदार बदल घडविण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असून विशेषत: पालिकांच्या शाळांमध्ये उत्तम आणि तंत्रज्ञानयुक्त शिक्षण सहज सोप्या पद्धतीने मिळावे, टेलिमेडिसिनसारख्या यंत्रणेच्या उपयोगातून दूर्गम भागामध्ये चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी देखील उद्योजकांची मदत घेतली जाईल.
उद्योग आणि शिक्षण यांची सांगड
यावेळी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे आमचे धोरण असून यामध्ये लघु आणि मध्यम उद्योगांचा देखील विचार करण्यात आला आहे. रोजगार निर्मिती होण्यावरही भर दिला असून उद्योग आणि शिक्षण यांची सांगड घालण्यात येत आहे.
महाराष्ट्र जगला तर देश जगेल
यावेळी बोलताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्ते, पदपथ यांची अवस्था सुधारून त्यांचे उत्तम दर्जाचे सौंदर्यीकरण करण्यात येत असल्याची माहिती दिली. अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना शहरात राबविण्यात येणार असून 66 हरित ठिकाणे विकसित करण्यात येतील. घनकचरा व्यवस्थापनावर देखील अधिक भर देण्यात येत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरी सुविधांविषयक तक्रारींची तातडीने दखल घेण्यात येत आहे असे सांगितले. वाहतूक व्यवस्थापनाला डोळ्यासमोर ठेऊन एकूणच शहरांमधील रचना असेल असे नियोजन असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी नाईट लाईफ धोरण, पर्यावरण, इलेक्ट्रिक वाहने आदी विविध विषयांवर प्राधान्याने काम करणार असल्याचे सांगितले.
उद्योजकांनी व्यक्त केल्या अपेक्षा
यावेळेला रतन टाटा, मुकेश अंबानी, उदय कोटक, आनंद महींद्र, आदी गोदरेज, हर्ष गोयंका, मानसी किर्लोस्कर, राजेश शाह, आनंद पिरामल, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, वरुण बेरी, महेंद्र तुराखिया, रवी रहेजा, बाबा कल्याणी, गोपिचंद हिंदुजा, सज्जन जिंदाल, गौतम सिंघानिया, दीपक पारेख, पिरोजशा गोदरेज, भविन तुराखिया या मान्यवर उद्योजकांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या तसेच नवीन शासनाला उद्योगाच्या भरभराटीसाठी सूचनाही केल्या.
उद्योगांना विविध परवानग्या अधिक गतीने मिळाव्यात, वीज दरामध्ये अधिक सवलत मिळावी, उद्योगांच्या वाढीसाठी अधिक धाडसी निर्णय घ्यावेत, तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग करून घ्यावा, मुंबईला आर्थिक केंद्र व्हावे, मोठ्या उद्योगांबरोबर छोट्या उद्योग व्यवसायांचा देखील विकास व्हावा, परवडणारी घरे योजना अधिक योग्य पद्धतीने राबवावी, कृषी क्षेत्राचा विकास करताना पशुसंवर्धन उद्योग वाढीस लावावा, नवीन औद्योगिक वसाहती निर्माण कराव्यात, विशेष आर्थिक क्षेत्रे स्थापन करावीत, विशेष प्रकल्प वहनाद्धारे विविध प्रकल्पांना गती द्यावी, पर्यटन उद्योग वाढीस लावावा अशा विविध सूचना केल्या.
सीआयआयतर्फे उदय कोटक यांनी आभार मानले. याप्रसंगी कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, उद्योग आयुक्त हर्षदीप कांबळे हे देखील उपस्थित होते.