मुंबई : राज्यातील सागरी किनारपट्टीवर अनधिकृत आणि 12 सागरी मैल (नॉटिकल)च्या बाहेर जाणाऱ्या बोटींवर व नियमबाह्य मासेमारी करणाऱ्यांवर सागरी मासेमारी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषदेत अर्धातास चर्चेच्या माध्यमातून सदस्य ॲड. राहूल नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले समुद्रात मिनी पर्ससीन नेटधारकांकडून अनधिकृत मासेमारी संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. जानकर बोलत होते.
राज्यातील किनारपट्टीवरील भागात अनधिकृतपणे केल्या जाणाऱ्या मासेमारी संदर्भात कठोर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमध्ये आतापर्यंत 3 हजार 531 नौकांवर कारवाई केली असून त्यामधे 27 लाख 19 हजार 558 एवढा महसूल प्राप्त झाला असून, दंड आकारणीतून 12 लाख 32 हजार रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. यांत्रिकी नौकांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हिटीएस) ही प्रणाली बंधनकारक करण्यात येणार असून, या प्रणालीचे नियंत्रण जिल्ह्यातील मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त यांच्याकडे असणार आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ भरण्यात येणार असून यासंबंधातील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही पदुम मंत्री जानकर यांनी सांगितले.
मत्स्यव्यवसाय वाढीसाठी 1 कोटीची नवीन योजना तयार करण्यात येणार आहे. राज्यात मत्स्यव्यवसाय धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखली बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल, असेही जानकर यांनी सांगितले.
या चर्चेदरम्यान सदस्य जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, हुस्नबानो खलिफे आदींनी सहभाग घेतला.