
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथील जोशीवाडी धरणाच्या खालची जमीन मोठ्या प्रमाणात खचल्यामूळे लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे.
देवरुख जवळील निवे धरण 1985 साली बांधण्यात आलं. सध्या या धरणात 50 टक्के पाणीसाठा आहे. धरण परिसरातील जमीन खचू लागली आहे. गुरुवारपासून जमीन खचण्यास सुरुवात झाली. गुरुवारी एक दोन भेगा होत्या. शुक्रवारी मात्र या भेगा वाढल्या. जवळपास 25 ते 30 ठिकाणी जमिनीला मोठ मोठे तडे गेले असून भेगांची रुंदी वाढत आहे. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे धरणाजवळ तडे जात असल्याने कालव्याच्या प्रवाहाने देखील जागा बदलली आहे. या मोठ्या भेगा पडल्याने काजूची अनेक झाडं जमीनदोस्त झाली आहेत. प्रशासनाच्या टीमने देखील या जागेची पाहणी केली. दरम्यान भूवैज्ञानिकांना याची माहिती देण्यात आली असून धरणाचा आणि या भेगांचा काही संबंध नसल्याचं पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता दाभाडे यांनी म्हटलं आहे. आमदार सदानंद चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देऊन एकूण परिस्थितीची पाहणी केली. तसेच इथल्या लोकांनी सतर्क राहावं असं आवाहनही चव्हाण यांनी केलं आहे.














