मुंबई (रुपेश दळवी) : गोरेगाव पूर्वेतील नागरी निवारा विद्यालयातील माजी विद्यार्थी रविवारी शाळेत एकत्र आले होते. त्यानिमित्त ‘अंकुर सोहळा विद्यार्थ्यांचा’ स्नेहसंमेल भरविण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
“आपल्याला शाळेसाठी काहीतरी करता येईल“ हा हेतू संमेलन भरविण्यामागे होता.विश्वस्त समितीचे श्रीधर शिवराम महाडेश्वर, विजया आसबे यांसमवेत सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आसबे तसेच निवारा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका समीक्षा साळसकर यांचे मार्गदर्शन लाभलं. खूप वर्षांनंतर शाळेत गप्पा, गाणी, किस्से, हशा, टाळ्या अश्या वातावरणात संमेलन साजरे झाले.
माजी विद्यार्थी संघातर्फे सादर केलेली माजी विद्यार्थी संघाची संकल्पना, ज्या मार्फत पुढील कार्यक्रमांचा आराखडा सादर करण्यात आला. शाळेत क्रीडा शिबिरे, कला स्पर्धा तसेच इतर अभ्यासेतर उपक्रम घेण्यात येतील, असे सांगण्य़ात आले. विविध क्षेत्रात उच्च पदावर असलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सहकार्य करू, असे सांगितले. संमेलन यशस्वी होण्यामागे सोशल मिडियाचा हातभार लागला.