मुंबई : राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद– पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेले यश रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सादर केले आहे आणि त्यांच्या आशिर्वादाने जनतेसाठी चांगले काम करून दाखविण्याची ऊर्जा घेऊन आलो आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत केले.निवडणुकीत मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार, प्रदेश संघटनमंत्री प्रा. रविंद्र भुसारी, प्रदेश उपाध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा ॲड. माधवी नाईक, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, आ. राज पुरोहित, आ. तमिळ सेल्वन, नवनिर्वाचित नगरसेवक अतुल शाह, दीव दमणचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी व कांताताई नलावडे यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपातील प्रमुख नेत्यांनी शनिवारी सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले.
मुख्यमंत्री भाजपा कार्यालयातील कार्यक्रमात म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडावर जाऊन छत्रपतींचा आशिर्वाद घेतला. विधानसभा निवडणुकीतही आपण शिवछत्रपतींचा आशिर्वाद घेतला होता. महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर रायगडावर जाऊन शिवछत्रपतींचा आशिर्वाद घेतला व आव्हानांचा सामना करण्यासाठी ऊर्जा घेऊन आलो. त्याच्या आधारे जनतेसाठी चांगले काम करून दाखवू.
त्यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. इतर सर्वांच्या नगरसेवकांच्या संख्येची बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त नगरसेवक भाजपाचे आहेत. जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. समाजाच्या सर्व घटकांनी भाजपावर विश्वास दाखविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पारदर्शी प्रामाणिक राजकारण सुरू केल्यामुळे जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला असून सर्वत्र भाजपाला यश मिळत आहे.