नागपूर : नितीन गडकरी हे कर्तृत्वान सहकारी, विकासाचा ध्यास असलेले नेते आहेत. विधानमंडळात व संसदेतही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटविला आहे. विद्यार्थी दशेपासूनच नितीनजींनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. सामान्य कार्यकर्ता आणि सर्वस्तरातील घटकांना एकत्र घेऊन प्रभावीपणे प्रशासन कसे करावे हे गडकरींनी दाखवून दिले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी काढले. कस्तुरचंद पार्क येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ठ्यब्दिपूर्तीनिमित्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
देशातील व राज्यातील दळणवळण क्षेत्रातील अनेक भव्य प्रकल्प त्यांनी दर्जेदारपणे, योग्य वेळेत व कमी किंमतीत पूर्ण केले आहेत. मराठी माणूस देशपातळीवर उल्लेखनीय काम करत आहे, हे नक्कीच गौरवास्पद आहे. गडकरी हे शेती व शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. विदर्भात साखर कारखानदारी त्यांनी यशस्वी करून दाखविली. बहुसंख्यांच्या हिताची जपणूक करणारा व सर्वस्तरात मैत्री जपणारे असे नितीनजींचे व्यक्तिमत्व आहे, असेही पवार म्हणाले .
दरम्यान दुर्दम्य इच्छाशक्ती, अतुट आत्मविश्वास बाळगणारा आणि विराट स्वप्ने सत्यात साकारणारा, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासगंगा पोहोचविणारा तसेच पक्षाभिनिवेश न बाळगता सर्वस्तरात जिवाभावाचे मैत्र जपणारा नेता अशा शब्दात सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कर्तृत्वाला सलाम केला.
आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, केंद्रीय मंत्री विजय गोयल, हंसराज अहिर, रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशाताई सावरकर, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला व बालविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजय संचेती, रावसाहेब दानवे, विनय सहस्त्रबुद्धे, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, नारायण राणे, माजी खासदार विजय दर्डा, अमृता फडणवीस, अभिनेता विवेक ओबेराय, सुलेखा कुंभारे, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये यांच्यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नितीन गडकरी हे लोकनेते आहे. गरिबांचा विकास हाच त्यांचा मुख्य एजेंडा असलेला देशातील नेता म्हणून त्यांची खरी ओळख आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक मुख्यमंत्री त्यांच्याकडे विकासकामे घेऊन जातात आणि ते कुणाचाही भ्रमनिरास करीत नाही. महाराष्ट्राच्या विकासकामासाठी सर्वाधिक निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांच्या जीवनात पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकासाची पहाट आणत आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच नितीन गडकरी, नवनिर्मिती करणे आणि त्यातून सर्वाचा सर्वागिण विकास या ध्यासाने ते अविश्रांत काम करत आहेत. जीवनाचा प्रत्येक क्षण मी त्यांच्यासोबत घालविला आहे. त्यांच्यात आत्मविश्वास भरभरून असल्यामुळे ते जे बोलतात ते करून दाखवितात. त्यामुळे त्यांना देशातील ‘मोस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर’ म्हणून ओळखले जाते.
माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, नितीनजींचे व्यक्तिमत्व दिलखुलास आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. सर्वसामान्यांशी असलेली नाळ जपणारे नितीनजी नागपूरच्या आणि विदर्भाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात. राष्ट्रीय महामार्ग उभारणीचे भव्यदिव्य काम नितीनजी मोठ्या हिमतीने पेलत आहेत.
यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ.रमण सिंह, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही नितीन गडकरी यांच्या सामाजिक कार्यांचा आढावा घेताना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. श्री.श्री. रविशंकर तसेच भारतरत्न लता मंगेशकर यांच्या शुभेच्छांचे वाचन करण्यात आले. यावेळी नितीन गडकरी यांच्यावर प्रभात प्रकाशनतर्फे तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले.
नितीन गडकरी षष्ठ्यब्दिपूर्ती गौरव समितीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कांचन गडकरी यांचा शाल व श्रीफल, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव केला. तसेच गौरव समितीतर्फे षष्ठ्यब्दिपूर्ती निमित्त 1 कोटी 1 लाख रुपयांचा धनादेश यावेळी त्यांना देण्यात आला. गौरव समितीतर्फे देण्यात आलेला निधीत तसेच यामध्ये आणखी भर घालून समाजामध्ये निरपेक्षपणे काम करणाऱ्या संस्थांना हा निधी वितरीत करण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी जाहिर केले.
इच्छाशक्तीच्या भरवशावर खूप मिळाले : गडकरी
सत्काराला उत्तर देताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, प्रतिकुल परिस्थितीत जीवनाची सुरुवात केली, सुरुवातीला केवळ पराजय बघितले. परंतू राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या प्रभावामुळे तसेच इच्छाशक्तीच्या भरवशावर खूप मिळाले आहे. मित्र आणि कार्यकर्ता हाच माझा परिवार असून विदेशात जे चांगले आहे. ते देशात, राज्यात व नागपुरात असावे, हीच माझी इच्छा असते.
समाजातल्या शेवटच्या घटकांचा विकास या उद्देशाने समाजकारण व राजकारण या क्षेत्रात कार्यरत असताना शेतकरी, शेतकऱ्यांपर्यत विकसीत तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या उद्देशाने सहकार क्षेत्रात कामाला सुरुवात केली. आज 2 लक्ष शेतकऱ्यांसाठी काम करताना त्यांना रोजगार दिला. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगताना नितीन गडकरी म्हणाले की, राजकारणाची गोळाबेरीज कधी केली नाही व करणारही नाही. राजकारणात सकारात्मक स्वभाव हे आवश्यक आहे. त्यामुळेच देशातील सर्व राजकीय पक्षांनी खूप प्रेम दिले. दिल्लीमध्ये काम करताना प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांना हवे असलेले प्रकल्प मंजूर केल्यामुळे मी सर्वांनाच विकासासाठी सहकार्य करतो, ही भावना असते.
विकासासाठी पैशाची कमी नाही केवळ इच्छाशक्ती हवी आहे. याच भावनेने काम करत असल्यामुळे संपूर्ण देशात दळणवळणाच्या सुविधा निर्माण होत आहे. मानस सरोवर यात्रा रस्त्याने २०१८ पर्यंत पंतप्रधानांना पूर्ण करता यावी यादृष्टीने प्रतिकुल परिस्थितीतही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामाला सुरुवात केली असल्याचे सांगतांना नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राची संसदीय परंपरा यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी निर्माण केली असून या परंपरेमध्ये राज्याच्या विकासासाठी काम केले आहे. त्यामुळे मतभेद असले तरी मनभेद न करता सर्वांना सोबत घेऊन विकासाचे ठरविलेले ध्येय पूर्ण केले आहे. नागपूरच्या सामान्य माणसाने खूप खूप प्रेम केले. हे मी कधीही विसरणार नाही आणि सामान्य जनतेच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहिल, असे अभिवचन सत्काराला उत्तर देताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी सांगितले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार प्रदर्शन केले.