दापोलीत नारळी, पोफळीच्या बाग झाल्या उद्धवस्त; बागायतदारांचं मोठं नुकसान
रत्नागिरी, 4 june : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यात मोठा फटका दापोली तालुक्याला बसला आहे. तसेच मंडणगड, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, संगमेश्वरलाही फटका बसला आहे. वादळाचे केंद्रबिंदू अलिबाग असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक वादळाचा फटका मंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांना बसला.
दापोलीत ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. अनेकांच्या घरांवर झाडं कोसळली आहेत. तर बागायतदारांचही मोठं नुकसान झालं आहे. आंबा, नारळ, पोफळी, फणसाची हजारो झाडं या वादळात भुईसपाट झाली आहेत. एकेका शेतकऱ्याची शेकडो झाडं पडली आहे.
एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे घरावरची कौले, पत्र कागदासारखी उडून जमीनिवर कोसळत होती. छतच राहील नाही त्यामुळे मिळेल तिथे आधार घेत कुटुंबातील ही मंडळी उघड्या डोळ्यांनी झालेले नुकसान पाहत होती. पावसाचे पाणी घरातील मांडलेला संसार उध्वस्त करत होते. हे चित्र या तीन तालुक्यातील सर्वाधिक पाहायला मिळाल. विजेचे खांब कोसळल्यामुळे पुरवठा खंडित झाला आहे. मोबाईल टॉवर पडले आहेत.
जिल्हाप्रशासनाने तात्काळ पंचनामे करायला सुरुवात केली आहे. दापोली तालुक्यातील कजिवली येथील मनोहर चव्हाण यांच्या काजू, आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. हर्णे बंदराजवळील नाडे गावातील सुमारे 80 घराचे या वादळात नुकसान झाले आहे. पाजपंढरीतील दोन जण वादळात जखमी झाले आहेत. आगरवायगणी तील वीरेंद्र येलंगे यांच्या बैल तर आंजर्ले तील राजेश बोरकर यांची गाय मृत झाली आहे. आंजर्लेतील मंगेश महाडिक याच्या सुमारे 48 कोंबड्या मृत पावल्या आहेत. आवाशी येथील 6 घरांचे नुकसान झाले आहे.
दापोली तालुक्यातील जालगाव येथील नरेंद्र बर्वे या बागायतदार शेतकऱ्याचंही मोठं नुकसान झालं आहे. बर्वे यांची जवळपास 500 पोफळीची झाडं, 20 आंबा कलमे, नारळ 15 ते 20, फणसाची 25 ते 30 झाडे उन्मळून पडली आहेत. आंब्याची झाडं तर 50 ते 60 वर्षांची होती. या वादळाबाबत माहिती देताना नरेंद्र बर्वे म्हणाले, निसर्ग वादळात झालेले नुकसान न भरून निघणारे आहे. पुढील पाच वर्ष याचा आर्थिक फटका आम्हाला सहन करावा लागणार आहे. दहा वर्षांपूर्वीच्या फयान वादळा पेक्षाही याच परिणाम अधिक आहे. स्वतःच्या जीवपेक्षा या झाडांना जपलं, पण या वादळात ती डोळ्यासमोर पडताना मनाला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात सांगू शकत नाही अशी भावना या नुकसानीबाबत प्रतिक्रिया देताना बर्वे यांनी व्यक्त केली.
गुहागरमध्येही ठिकठिकाणी नुकसान
गुहागरमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळून नुकसान झालं आहे. अनेक घरांचं नुकसान झालं आहे. काही पंचनामे झाले आहेत, तर काही पंचनामे सुरू आहेत. असगोली येथील संतोष आरेकर, आरे येथील गजानन कडजुळकर, भातगाव येथील अर्जुन गोरे, पटपन्हाळे येथील राजन चव्हाण, शृंगारतळी इसाक अब्बास, यांच्या घरावर झाड कोसळून अंशतः नुकसान झालं आहे.. तसेच गुहागर आणखी काही जणांच्या घरांवर झाड कोसळून नुकसान झालं आहे. तसेच काही ठिकाणी टॉवर तर काही ठिकाणी आंब्याची झाडंही उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी तर छताचे पत्रेच उडून गेले आहेत.
निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरी तालुक्यालाही फटका, 5 जण जखमी
रत्नागिरी तालुक्यातही वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालं. ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वाहणार्या वार्यांनी झाडे मुळापासून उन्मळून घरांवर कोसळली. घरांवर झाडं कोसळल्याने रत्नागिरी तालुक्यात पाच जणं जखमी झाले. तर काही घरांचे नुकसान झाले आहे.
मिरजोळे येथील एका घरावर झाड पडून तिन जणं जखमी झाले आहेत. उंडी येथील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच पूर्णगड येथील एका घरावर झाड कोसळल्यामुळे एक जणं जखमी झाला आहे.
रत्नागिरी तालुक्यात या वादळी वाऱ्यामुळे टाकळीवाडीत एक घर, झाडगावातील मयुर सावंत यांचे घर, नांदिवडेतील उमेश गडदेंचे घर, काळबादेवीत मारुती मयेकरांच्या घराचे पत्रे, पूर्णगड येथील सुबोध पिसेंच्या घरांचे पत्रे उडाले, निवळीतील मायंगडेचे छताचे, मजगाव येथील पंजाब नॅशनल बँकेजवळील एका घरावर झाड पडले, कुवारबाव येथील सुनिता गावकरांच्या घराचे पत्रे उडाले, फणसोपातील सुनिल साळवींच्या घराचे, भोकेत एका घराचे, जाकिमिर्यातील प्रभाकर जाधव यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले. नांदीवडेत विजेच्या खांबावर झाड पडून वाहिन्या रस्त्यावर पडल्या होत्या. नाणीज येथील रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक काही काळ बंद होती; मात्र ग्रामस्थांच्या मदतीने ते झाड काढून टाकण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. बसणी येथील गणपत लोगडे यांच्या घरावर सुरमाडाचे झाड कोसळून सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी शहरालाही याचा फटका बसला. शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयाच्या छतावरील पत्रे वार्यामुळे उडाले. कुर्धेतील शिंदे विकास शिंदेच्या घरावर झाड पडून घराचे नुकसान झाले असून दोघांना किरकोळ दुखापत झाली. सुरेश शिंदेंच्या रिक्षावर झाड कोसळले. सध्या ठिकठिकाणी पंचनामे सुरू असून, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे..
24 तासांत जिल्ह्यात सरासरी 93.44 मिलीमीटर पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी पाऊस 93.44 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड 130, दापोली 125, खेड 76, गुहागर 77, चिपळूण 102, संगमेश्वर 73, रत्नागिरी 40, लांजा 131, राजापूर 87 नोंद आहे. निसर्ग वादळाचा प्रभाव काल सायंकाळपर्यंत होता.