अलिबाग,जि.रायगड,16 June : दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीबाबत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची आणि झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे केंद्रीय पथकाला दिली.
यावेळी केंद्रीय पथकातील सदस्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना सूचना दिल्या की, चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबतची संख्यात्मक माहिती देताना छोट्या छोट्या गोष्टींचीही बारकाईने नोंद घेण्यात यावी. कृषी विभाग, मत्स्य विभाग, महसूल विभाग, महावितरण या संबंधित सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानीची बारकाईने नोंद घेऊन त्याप्रमाणे अहवाल तयार करावा, या अहवालाचा अभ्यास करून हे पथक पुन्हा एकदा जिल्ह्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळाच्या या आपत्तीमध्ये जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे अत्यंत कमी जीवितहानी झाली, संपर्क यंत्रणा अत्यंत कमी वेळात सुरू करण्यात यश मिळविले तसेच वाहतुकीसाठी रस्ते अत्यंत कमी वेळात खुले करण्यात आले, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले, त्यात बऱ्याच अंशी यश मिळाले आहे, गरजूंना अत्यंत तातडीने अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला, त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत केंद्रीय पथकात केंद्र शासनाच्या आंतर मंत्रालयीन पथकातील सदस्य सहसचिव (प्रशासन व सीबीटी) रमेशकुमार गंटा, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर.बी.कौल, संचालक, उर्जा मंत्रालयाचे एल.आर.एल.के.प्रसाद, ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव एस.एस.मोदी, कृषी मंत्रालयाचे आर.पी.सिंग आदींचा समावेश होता. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.