मुंबई, 9 जून : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने कोकणात प्रचंड नुकसान झाले. केंद्रातील मोदी सरकार जाणीवपूर्वक मदतीबाबत दुजाभाव करतेय. पश्चिम बंगाल व ओरिसाला मदत केली जाते, मात्र कोकणाला केली जात नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे याबाबत गप्प का आहेत? असा संतप्त प्रश्न जनता दल सेक्युलरने महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना विचारला आहे.
अलिकडेच पश्चिम बंगाल व ओरिसाला वादळाचा तडाखा बसला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याबरोबरच पश्चिम बंगालला एक हजार कोटी रुपयांची तर ओरिसाला ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. मग कोकणाबाबत केंद्राकडून दुजाभाव का केला जात आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे याबाबत गप्प का आहेत? का महाराष्ट्रात आता निवडणुका नाहीत, त्यामुळे राज्याला मदत करण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत आहे, असा सवालही जनता दलाचे प्रभाकर नारकर, सुहास बने व कोकण जनविकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
पावसाळ्यात सांगली-कोल्हापूर पट्ट्यात महापुराचा फटका बसला होता. त्यावेळीही राज्याला केंद्र सरकारकडून हाच अनुभव आला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
कोकण पट्टीला बसलेला निसर्ग वादळाचा तडाखा मोठा असून बागायत उद्ध्वस्त झाल्यामुळे जनतेच्या रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पश्चिम बंगाल व ओरिसाच्या धर्तीवर कोकणासाठीही एक हजार कोटी रुपयांची मदत द्यावी, त्यासाठी राज्य सरकारनेही केंद्राकडे मागणी करावी, असे या सर्वांनी म्हटले आहे.