रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेवून खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि. मी. भाडेदराच्या ५० टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने 27 एप्रिल 2018 रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत. तसेच प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणी बाबत mvdcomplaint.enf2@gmail.com या ईमेल आयडी वर तक्रार नोंदवण्यात यावी.
परिवहन आयुक्त यांनी परिवहन कार्यालयाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना राज्यात आगामी सुरू होणाऱ्या गर्दीच्या हंगामाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत.
१. गर्दीच्या हंगामात खाजगी बस मालकांकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रति कि. मी. भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारत नसल्याची वेळोवेळी सातत्याने खातरजमा करण्यात यावी.
२. उक्त विषयांकीत प्रकरणी वेळोवेळी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी.
३. खाजगी वाहतुकदारांनी निर्धारीत करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास सदर वाहतुकदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे.














