नागपूर : पिडित महिलांना वैद्यकीय मदत तसेच अन्य मदतीसाठी येत्या तीन महिन्यांत निर्भया सेंटर सुरु करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मालाड पूर्व येथील विशेष अल्पवयीन गतीमंद मुलीचे तिसऱ्यांदा अपहरण झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, या मुलीचे तीन वेळा अपहरण झाले. तिन्ही वेळेस आरोपी वेगळे होते. तीनही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. पिडित व तिच्या कुटुंबियांना आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण देण्याची तजवीज करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या पिडित महिलांच्या वैद्यकीय उपचार व अन्य साहाय्यासाठी निर्भया सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत आशिष शेलार, शशिकांत शिंदे, अतुल भातखळकर यांनी भाग घेतला.