
रत्नागिरी : कोणतेही सत्तास्थान नसताना रायपाटण पुलाचे काम मंजूर करुन आणणे म्हणजेच राणे यांच्या नावाचा दबदबा आजही कायम असल्याचे हे द्योतक आहे. त्यामुळे देऊ तो शब्द पुरा करु ही धमक फक्त आणि फक्त राणेंमध्येच आहे. गेली पाच वर्षे रत्नागिरी जिल्हा विकासापासून वंचित राहिला आहे. जिल्ह्याला पुन्हा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपणाला श्रेयवादाची नाही तर विकासाची लढाई लढायची आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांनी केले. ते राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील पुलाच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी चारवाडी ग्रामस्थांसह तमाम रायपाटणवासीयांच्या चेहर्यावर दिसलेला आनंद पाहून तसेच कार्यक्रमाची गर्दी पाहून निलेश राणे यांनी समाधान व्यक्त केले.
रायपाटण गावातील चारवाडी ग्रामस्थांच्यावतीने दिनांक १४ मे २०१८ रोजी होळीचा मांड या ठिकाणी उपोषण छेडण्यात आले होते. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांच्या हस्ते सरबत घेऊन ग्रामस्थांनी उपोषण सोडले होते. त्या आश्वासनाची पूर्तता आज रायपाटणवासीयांना अनुभवता आली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, जिल्हा सचिव दीपक बेंद्रे, पक्षाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग निरिक्षक विलास पेडणेकर, तालुकाध्यक्ष हनिफ काझी, शहराध्यक्ष संजय ओगले यांजसह प्रकाश शेट्ये, प्रभाकर पळसुलेदेसाई, आबा शेट्ये व सुभाष निखार्गे आदी मान्यवर उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे या जिल्ह्यातील सत्तास्थाने उपभोगत असलेल्या शिवसेनेचा विकासाशी काडीचाही संबंध नाही. या पुलाचे काम करुन देण्याचे आश्वासन देणारा स्थानिक आमदार हा भूलथापा मारणारा आहे. तर त्याचा पक्ष हा फक्त फुकटचे श्रेय घेणारा आहे. विद्यमान खासदारांचा विकास आणि जनता यांच्याशी गेल्या पाच वर्षात संबंधच आलेला नाही. त्यामुळे कोणतेही काम न करताच फक्त श्रेय घेण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या सेनेकडे आहे. जिल्ह्यातील एका सामूदायिक विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमात ज्याचे आयोजन एका गुजराती व्यक्तीने केले होते तेथे पक्षाचा बॅनर लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न सेनेने केला असे सांगून माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, मोठा गाजावाजा करुन लांजा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करणाºया खासदारांना व त्यांच्या पक्षाला एकाही बेरोजगाराला न्याय देता आला नाही उलट या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांची कुचेष्टाच केली गेली.
नाणार रिफायनरी प्रकल्प हा ग्रामस्थांनी केलेल्या संघर्षामुळे रद्द झाला असून त्याचे श्रेय सेनेच्या आमदार व खासदारांनी घेऊ नये असेही राणे यांनी ठणकावून सांगितले. रायपाटणसह तालुक्याचे अनेक प्रश्न आपणांस मार्गी लावायचे आहेत. त्यामुळे निलेश राणे हा सुखदु:खात व विकासाच्या बाबतीत कायम तुमच्यासोबत असेल. कोकणचा खासकरुन रत्नागिरी जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर उद्याच्या लोकसभा निवडणूकीत बदल होणे गरजेचे आहे. जनशक्ती ही राणेंची ताकद आहे. त्यामुळे आम्हाला फक्त आशीर्वाद पाहिजेत. त्याबळावर विकासाच्या माध्यमातून या कोकणचा कायापालट कसा करायचा हे आम्ही दाखवून देऊ असेही निलेश राणे म्हणाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश गांगण, प्रसाद पळसुलेदेसाई, प्रकाश पाताडे, आबा शेट्ये, जितेंद्र गांगण, सुहास गांगण, अनिल पाटणकर व चारवाडी संघर्ष समिती यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद पळसुलेदेसाई यांनी केले.















