दीपक केसरकर यांना कसला तरी मानसिक रोग झाला आहे असं मला वाटतं
निलेश राणेंचा केसरकरांवर घणाघात
केसरकरांचा वरचा माळा रिकामा झालाय किंवा वरच्या माळ्यात काहीतरी गडबड झाली आहे – निलेश राणे
रत्नागिरी, प्रतिनिधी : शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राणेंवर केलेल्या टिकेनंतर भाजपा प्रदेश चिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी केसरकर यांना आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं आहे. दीपक केसरकर यांना कसला तरी मानसिक रोग झाला आहे, त्यांचा वरचा माळा रिकामा झालाय किंवा वरच्या माळ्यात काहीतरी गडबड झाली आहे अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. तसेच तुम्ही नख लावाल तर आम्ही फाडून टाकणार हे लक्षात ठेवा असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.
निलेश राणे यांनी केसारकरांवर टीका करताना म्हटलं आहे की, दीपक केसरकर हे स्वतःला खूपच महत्त्व द्यायला लागले आहेत. केसरकरांचं एवढं महत्त्व केव्हाच नव्हतं आणि आता ते शिल्लक पण राहीलेलं नाही. दिपक केसरकर यांनी स्वतःची काय लायकी आहे ते आधी ओळखावी. ते कदाचित विसरले असतील. पण मला तर वाटतं त्यांना कसला तरी मानसिक रोग झाला आहे. एक दिवस ठाकरे कुटुंबाबद्दल चांगले बोलतात दुसऱ्या दिवशी त्यांच्या विरोधात बोलतात. केसरकरांचा वरचा माळा रिकामा झाला किंवा काहीतरी वरच्या माळ्यात काहीतरी गडबड झाली आहे अशी खोचक प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली आहे.
तसेच सुशांत सिंह राजपूत केसमध्ये सुप्रीम कोर्टात आदित्य ठाकरेचं नाव कोणी घेतलं, नाव का घेतलं गेलं हे आधी केसरकरांनी जुने रेकॉर्ड काढून पाहावं, तिथे कोणी राणे नव्हते अशीही टीका निलेश राणे यांनी केली आहे. तसेच केसरकर यांनी औकातीत राहायला शिकावं, त्यांची औकात काय आहे, ती मागच्या वेळी मी काढली हाती, परत त्यामध्ये जात नाही, पण तुम्ही नख लावाल तर आम्ही फाडून टाकणार हे लक्षात ठेवा, आमच्या भानगडीत जाऊ नका असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.
ट्विटरवरूनही साधला होता निशाणा
दरम्यान निलेश राणे यांनी ट्विटरवरूनही केसरकरांवर निशाणा साधला होता. या ट्विटमध्ये त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर बोचरी टीका केली होती. ‘दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे. नोकरी मागायची आहे तर नीट मागा. 1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे,’ असं निलेश राणे यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.