रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): आॅनलाइन परीक्षेच्या निकालासह कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या येत्या १५ दिवसात मान्य करा, अन्यथा १ सप्टेंबरला कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयाला टाळ ठोकू असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा एकत्रित मेळावा कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने गुरुवारी रत्नागिरीमध्ये मराठा मंडळ सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रकल्पग्रस्तांना संबोधित करताना निलेश राणे म्हणाले की केवळ निवेदने, मेळावे घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटणार नाहीत तर त्यांना आमच्या पद्धतीने उत्तर द्यावे लागेल. कोकण रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल मला चांगली माहिती आहे. असुर्डे रेल्वे थांबा, दुपदरीकरण, टर्मिनस अशा विविध मागण्या आम्ही कोकण रेल्वेकडे केल्या होत्या, माझा ७० लाखांचा खासदार निधी देऊ केला. पण या परप्रांतीय अधिका-यांशी फक्त चर्चेने प्रश्न सुटणार नाहीत. तर त्यांना आमच्या भाषेतच उत्तर द्यावे लागेल असे निलेश राणे म्हणाले.
संपूर्ण कार्पोरेशनमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. त्यामुुळे आता आमची मुलं तुमच्याकडे नोकरीची भीक मागणार नाहीत, त्यांचा हक्क घेणार आणि त्यासाठी मी तुमच्यावतीने संघर्ष करायला तयार आहे. आता केवळ चर्चा करायची नाही तर आॅनलाईन परिक्षेचा निकाल या मागणीसह प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न येत्या १५ दिवसांत मार्गी लावले नाहीत तर १ सप्टेंबरला कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयाला मी स्वत: जावून टाळ ठोकणार असा खरमरीत इशारा निलेश राणे यांनी दिला. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष विनायक मुकादम, सचिव अमोल सावंत, सहसचिव प्रभाकर हातणकर, खजिनदार
प्रतिक्षा सावंत, संगमेश्वर तालुकाध्यक्ष अतुल कुंभार, मुंबई विभागप्रमुख काशिराम टक्के, चिपळूण कार्यकारिणी सनी मयेकर, चिपळूण तालुकाध्यक्ष विराज खताते यांच्यासह तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.