रत्नागिरी (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विनायक राऊत नाही उत्पन्न लपवले, असा आरोप स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांनी केला. अर्ज छाननीप्रक्रियेदरम्यान हरकती घेऊन त्यांनी राऊत यांना लक्ष्य केले. तसेच उत्पन्नाबाबतची खोटी माहिती दिल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. आज उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे, विनायक राऊत आणि नविनचंद्र बांदिवडेकर यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, राणे यांनी राऊत यांच्या अर्जावर आक्षेप नोंदवला. तसेच राऊत यांची अग्रीकल्चर जमीन आहे, मात्र त्याचं उत्पन्न त्यांनी दाखवलेलं नाही.. राऊत यांचे बँकेत ४ लाख जमा आहेत, मात्र त्याच्या व्याजाचा कुठेही उल्लेख नाही. मुंबईतील एका प्रॉपर्टीत त्यांची ३० टक्के भागीदारी आहे, मात्र तेही कुठे दाखविलेलं नाही आदी हरकती घेतल्या. सर्व हरकती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे राणे यांनी सांगितले. याबाबत निवडणूक निरीक्षकांकडे (ओब्जरवर) तक्रार करणार असून राऊत यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, या मागणीसाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे राणे यांनी सांगितले. राणे यांच्या तक्रारीचे आघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांचे प्रतिनिधी अशोक जाधव यांनी समर्थन दिले. दरम्यान खंबाटा प्रकरणावरून विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर केलेल्या आरोपांना निलेश राणे यांनी यावेळी प्रत्त्युत्तर देत विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. खंबाटा एव्हीशनच्या शेवटच्या करारावर फक्त मान्यताप्राप्त संघटना असलेल्या भारतीय कामगार सेनेच्या प्रतिनिधीच्या सह्या होत्या. नितेश राणेंची कुठेही सही नव्हती. फक्त 2012 मध्ये पगार वाढीच्या करारावर नितेश राणे यांची सही होती. शेवटचा टप्पा कामगारांना देऊ नका असं सांगणाऱ्या करारावर भारतीय कामगार सेनेच्याच प्रतिनिधीच्या सह्या होत्या, असा पलटवार राणे यांनी यावेळी राऊतांवर केला.