रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे येत्या 1 एप्रिलरोजी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, देवगडचे आमदार नितेश राणे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, मंगेश शिंदे, डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हेही उपस्थित राहणार आहेत.
येत्या 23 एप्रिल रोजी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची निवडणूक होत आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होईल असं सध्या तरी चित्र आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निलेश राणे 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते, त्यावेळी त्यांनी सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये मात्र शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा पराभव केला होता. यावेळी निलेश राणे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले असून येत्या सोमवारी म्हणनेच 1 एप्रिल रोजी ते रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी स्वत: खा. नारायण राणे, आ. नितेश राणे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सिंधुुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, मंगेश शिंदे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख बाळा कसालकर, सिंधुदुर्ग जिल्हा प्र्रवक्ता सतीश सावंत, रत्नागिरी जिल्हा प्रवक्ता नित्यानंद दळवी, जिल्हा प्रभारी राजन देसाई यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
यानंतर रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.