अलिबाग,जि.रायगड, 6 june : नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. आज माणगाव तालुक्यातील माणगाव, गोरेगाव, मोर्बा, सुर्ले आदिवासीवाडी, नागाव, वडवली, पुरार, वणी, नांदवी, इंदापूर आदि नुकसानग्रस्त भागांची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पाहणी करून बाधित नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरांचे पत्रे उडाले असून वीजपुरवठाही खंडीत झालेला आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरीत पूर्ण करून सर्वांना तातडीने मदत पोहचविण्याचे निर्देश प्रांताधिकारी, तहसिलदार यांना देण्यात आले आहेत. जेणेकरून जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत मिळेल. ज्या गावांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाण्याची समस्या उद्भवली आहे, त्या ठिकाणी टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पोहोचविले जात आहे.
विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू असून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त नागरिकाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे आश्वासक वक्तव्य पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.