
मुंबई : ८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्ताने मॅरिकोच्या निहार शांती आमलाने ‘फोन उठाओ इंडिया को पढाओ’ हे आगळेवेगळे अभियान सुरु केले आहे. शिक्षण हा प्रगतीचा पाया असतो हा विचार डोळ्यासमोर ठेऊन निहार शांती आमला ब्रँड सामाजिक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. वंचित वर्गातील मुलांना इंग्रजी संभाषणाची मूलभूत कौशल्ये आत्मसात करता यावीत यासाठी त्यांचा शहरांमधील स्वयंसेवकांसोबत फोन कॉल्स मार्फत संपर्क साधून देणे हे या अभियानाचे उद्धिष्ट आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल. दर आठवड्याला फक्त १० मिनिटे फोनवर बोलून एखाद्या गरीब मुलाला इंग्रजी संभाषणाच्या सरावात तुम्ही मदत करू शकता.
गेली पाच वर्षे निहार शांती आमला ब्रॅंडतर्फे “निहार शांती पाठशाला फनवाला” हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये मुलांना अतिशय साध्या सोप्या पद्धतीने, आयव्हीआरवर आधारित प्रशिक्षण मॉड्युल्सवर आधारित इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण मोफत आहे. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून गावांमधील जवळपास तीन लाखांहून जास्त मुलांच्या जीवनात घडून येत असलेल्या सकारात्मक परिवर्तनातून उपक्रमाचे यश दिसत आहे. परंतु ब्रँडच्या असेही लक्षात आले आहे की, भाषा आत्मसात करण्यासाठी तिच्या संभाषणाचा सराव केला जाणे आवश्यक असते. आज शहरात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांची सामाजिक कार्यात मदत करण्याची इच्छा आहे पण व्यस्त दिनक्रमामुळे पुरेसा वेळ देता येत नाही, त्यामुळे तशी संधी मिळत नाही. ही एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन ‘फोन उठाओ इंडिया को पढाओ’ हे आगळेवेगळे अभियान सुरु केले गेले आहे. यामध्ये शहरातील शिक्षित लोकांना गरीब मुलांसोबत जोडले जाईल. तंत्रज्ञानाचा माध्यम म्हणून वापर करत शहरातील स्वयंसेवक या मुलांना इंग्रजी संभाषणाचा सराव देतील. अशाप्रकारे मुलांचे इंग्रजी शिक्षण यशस्वी होण्यात मदत मिळेल.
मॅरिकोचे चीफ मार्केटिंग ऑफिसर कोशी जॉर्ज यांनी सांगितले, “मुलांच्या शैक्षणिक यशामध्ये सुधारणा घडून यावी यासाठी निहार शांती आमला ब्रँड सतत प्रयत्नशील आहे. निहार शांती आमला पाठशाला फनवाला या उपक्रमातून आम्ही मुलांना इंग्रजी भाषेचे शिक्षण कधीही, कुठेही घेता येईल अशी सोय उपलब्ध करवून दिली. फोन उठाओ इंडिया को पढाओ हा याचा पुढचा टप्पा आहे. मुले आजवर जे काही शिकली आहेत त्याचा सराव त्यांना करता यावा यासाठी फोन संभाषण हा सोपा मार्ग आम्ही वापरत आहोत. त्याचबरोबरीने या उपक्रमातून आम्ही शहरातील समाजसेवेसाठी इच्छुक व्यक्तींना या मुलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यात योगदान देण्याची संधी देत आहोत. यातून ते शिक्षित, तडफदार युवा भारत निर्माण करू शकतील.”
या वर्षाच्या सुरुवातीला लखनौमध्ये एक चाचणी उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी महिन्याभरात २००० पेक्षा जास्त मुलांनी इंग्रजी भाषेच्या सरावात भाग घेतला. आजवर शहरांमधील स्वयंसेवकांनी ५५००० मिनिटांच्या फोन कॉल्समध्ये गरजू मुलांकडून इंग्रजी संभाषणाचा सराव करून घेतला आहे. चाचणी उपक्रमाला मिळालेल्या यशापासून प्रेरणा घेऊन संपूर्ण देशभरात या उपक्रमाचा प्रसार केला गेला आहे. निहार शांती आमलाच्या ब्रँड अम्बॅसॅडर विद्या बालन यांनी तसेच इतर अनेक सेलिब्रेटीजनी आपापल्या चाहत्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. स्वयंसेवक म्हणून नोंदणी करून दर आठवड्याला फोनवर दहा मिनिटे देण्याचे देखील आवाहन त्यांनी केले आहे.
उपक्रमाची सुरुवात केली जात असताना बिग एफएमवर एक रेडिओ कॅम्पेन चालवले गेले. त्याचबरोबरीने सोशल मीडिया पार्टनर्समार्फत हा संदेश सर्वत्र पसरवला गेला. गेल्या काही वर्षात निहार शांती पाठशाला फनवाला उपक्रमाने ग्रामीण स्तरावरील सर्वदूर पसरलेला आघाडीचा उपक्रम म्हणून यश मिळवले आहे. गेल्या वर्षी ७५०० पेक्षा जास्त गावांमधील ३ लाख मुलांकडून १० लाख कॉल्स केले.
















