रत्नागिरी (आरकेजी): गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांनी प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे आरोग्य सेवा कोलमडली असून, या कर्मचार्यांनी ४८ तासांच्या आत कामावर रुजू व्हावे, अन्यथा त्यांची सेवा समाप्त केली जाईल, असे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत. याबाबतची नोटीस जिल्हा परिषद प्रशासनाने बजावली आहे.
एनएचएम अंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागात १२०० कर्मचारी कार्यरत आहेत. या कंत्राटी अधिकारी व कर्मचार्यांच्या प्रमुख मागण्या शासन स्तरावर प्रलंबीत आहेत. या मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी त्यांनी यापूर्वीही कामबंद आंदोलन पुकारले होते, मात्र काही मागण्या मान्य करून उर्वरित मागण्यांबाबत अजूनही शासन स्तरावर ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे या अधिकारी, कर्मचार्यांनी ८ मे पासून कामबंद आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे आरोग्य सेवा कोलमडली असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्यामुळे शासनाने आंदोलक अधिकारी, कर्मचार्यांना ४८ तासांत कामावर रूजू व्हा, अन्यथा सेवा समाप्त करण्यात येईल असे आदेश काढले आहेत. शासनाने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. त्यानुसार प्रशासनाने आंदोलक अधिकारी व कर्मचार्यांना कामावर रूजू होण्याचे आवाहन केले. कामावर रूजू न होणार्या अधिकारी, कर्मचार्यांविरूद्ध शासन निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशा नोटीसा बजावल्या आहेत.