मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात शौचालयांची बांधणी करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. त्यानुसार नव्या वर्षात मुंबईकरांना १८ हजार ८१८ शौचकुपे उपलब्ध होणार आहेत. या बांधकामांसाठी ३७६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी याबाबतच्या निविदा प्रक्रियेला मंजूरी दिली असून येत्या १५ जानेवारी २०१८ पर्यंत शौचालयांच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. यात दुमजली व तीनमजली शौचालयांच्या बांधकामांचा समावेश असणार आहे.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या शौचालयांबरोबरच धोकादायक स्थितीतील शौचालये तोडून त्याठिकाणी शौचालयांची पुनर्बांधकाम केले जाणार आहे. जुन्या ११ हजार १७० शौचकुपांच्या जागेत १५ हजार ७७४ शौचकुपांचे नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. हे बांधकाम करताना नवीन व सुधारित आरेखनांचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांना जुन्या शौचालयांच्या जागेत अतिरिक्त ४ हजार ६०४ शौचकुपे उपलब्ध होतील. तसेच ३ हजार ४४ अतिरिक्त शौचकुपे नव्याने बांधण्यात येणार आहेत. गेल्या सुमारे २० वर्षात बांधण्यात आलेली बहुतांश शौचालये ही एकमजली शौचालये आहेत. महापालिका क्षेत्राची गरज लक्षात घेऊन, पालिकेने शक्य त्याठिकाणी दुमजली व तीनमजली शौचालये बांधण्याचे प्रस्तावित आहे. यात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र मुतारी आणि लहान मुलांसाठी वेगळी व्यवस्था असेल. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शौचालयांच्या तळमजल्यावरच सुयोग्य व्यवस्था केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.