डोंबिवली : मध्य रेल्वेवरील अंबरनाथ बदलापूर परिसरात मोठया प्रमाणात औद्योगिकीकरण व नागरिकीकरण झाले असल्यामुळे दोन्ही स्टेशनच्या दरम्यान सुमारे आठ ते दहा कि.मी. अंतर आहे. मध्यभागी असणाऱ्या चिखलोली येथे रेल्वे स्थानक उभारावे अशी मागणी गेले दोन दशके नागरिक करत आहेत. परंतु प्रशासन काही कारवाई करत नव्हती अखेर कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रश्नाला प्रधान्य दिल्यामुळे रेल्वेने नागरिकांची मागणी पूर्ण केली असून चिखलोली रेल्वे स्थानक अस्तित्वात येणार आहे. सध्या जागेचा शोध सुरु असून येत्या काही महिन्यात प्रत्यक्ष रेल्वे स्थानकाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
वास्तविक परिपूर्ण दर्जा असलेले स्थानक असण्याची गरज असताना रेल्वेने हॉल्ट स्टेशनचा प्रस्ताव पाठवला होता. याला ठामपणे विरोध केला व परिपूर्ण दर्जा असलेले स्टेशन उभारण्याची मागणी केली. लोकसभेत या विषयी शिंदे यांनी आवाज उठवला. सतत पत्रव्यवहार केला अखेर 2014 मध्ये चिखलोली स्थानकाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला. परंतु त्याला मंजूरी मिळत नव्हती. मध्यरेल्वेवरील सर्वाधिक अंतर अंबरनाथ बदलापूर दरम्यान आहे. या भागात मोठया प्रमाणात उद्योग उभाण्यात आले आहेत. मोठ मोठी निवासी संकुले उभी राहिली आहेत. दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान बरेच अंतर असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक परिसरात संरक्षण दलाची मोठी वसाहत आहे. संरक्षण दलाने पाच कोटी रुपये देण्याची तयारी दाखवून रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी केली होती. त्यालाही रेल्वेच्या आडमुठया धोरणामुळे वाटयाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या होत्या. परंतु खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला व अखेर त्याला यश आले आहे.