डोंबिवली, (प्रशांत जोशी) : नेवाळी येथे जमीन नौदलाकडून संपादित करण्यात येत आहे, त्याला आज शेतकर्यांनी तीव्र विरोध केला. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक करीत पोलिसांची सहा वाहने जाळली. रस्त्यावर टायर जाळून रस्ता बंद करण्याचाही प्रयत्न केला गेला. यामुळे डोंबिवली– कर्जत वाहतूक काही वेळ बंद झाली होती. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी भाल गावात पॅलेट गनचा वापर केला यामध्ये काही शेतकरी आणि पोलीस जखमी झाले.
हिंसक आंदोलनादरम्यान १२आंदोलक आणि १० पोलीस अधिकारी – कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नेवाळी येथील जमीन केंद्र आणि राज्य सरकारने विमानतळासाठी घेतली होती. पण आता तसे होणार नसल्याने आमची जमीन परत करा अशी मागणी करीत गेली आठ वर्ष जमीन बचाव आंदोलन समिती श्रीमलंगगड करीत आहे. यासाठी येथील शेतकरी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. काही दिवसांपासून येथे विमानतळासाठी संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. सकाळी येथील शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला. आंदोलनकर्ते डावल पाडा नाका येथे एकत्र आले.
पोलिसांनी पॅलेट गनचा वापर करून आंदोलनकर्त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. जखमी शेतकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीसही जखमी झाले. त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत. समितीचे चैनू जाधव यांनी शेतकऱ्याच्या जमिनी सरकारने परत केल्या पाहीजे. यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील असे सांगितले.
भाजपचे जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना जागा मिळालीच पाहिजे. याबाबत भाजपा नेत्यांशी तसेच स्थानिक आमदार आणि केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. हा विषय लोकसभेत तसेच विधानसभेत आला असून त्यावर लवकरात लवकर तोडगा निघायला हवा. शेतकऱ्यांच्या जमिनी परत त्यांच्या नांवे केल्या पाहिजेत.
प्रतिक्रिया :
नेवाळी येथील जमिनींचा प्रश्न ७५ वर्षे प्रलंबित आहे. ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. सर्व सहमतीने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाषजी भामरे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी यासंदर्भात सर्व संबंधितांची तातडीने बैठक लावून तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले आहे. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. – एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा
>>>>>>>>>>>>>>>>>>>>
१९९४ पर्यंत नेवाळी परीसरातील जागेच्या सातबाऱ्यावर शेतकऱ्यांची नावे होती तसेच सदरची जागा संरक्षण खात्याने भाडेतत्वावर घेतल्याचे कागदपत्रे शेतकऱ्यांकडे आहेत. त्यामुळे कोणतीही भरपाई न देता नावावर केलेल्या सदर जमिनीच्या सातबाऱ्यावरील संरक्षण खात्याच्या नोंदी कमी कराव्यात. केंद्र सरकाराने थेट शेतक-यांशी चर्चा करावी. – राजू (प्रमोद) पाटील, सरचिटणीस, मनसे